मुंबई - राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज मुंबईमेट्रो-3 च्या संचालक अश्विनी भिडे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. तसेच एमएमआरसीएल आणि मेट्रो-3 चे संचालकपदही अश्विनी भिडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. आरे येथील मेट्रो-3 च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र हे मतभेद बाजूला ठेवत अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे. दरम्यान, अश्विनी भिडे यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे मुंबई आणि परिसरात मोठी गुंतवणूक करून सुरू करण्यात आलेल्या विकास प्रकल्पांना महाविकासआघाडीच्या सरकारकडून कुठल्याही प्रकारची स्थगिती दिली जाणार नाही. तसेच या प्रकल्पांचे काम पूर्वनियोजित पद्धतीनेच पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील आरे कारशेडमधील वृक्षतोडीवरून वाद झाल्यानंतर मेट्रो-3 च्या संचालक असलेल्या अश्विनी भिडे यांना शिवसेनेने टीकेचे लक्ष्य केले होते. आरे येथील कारशेड अन्यत्र हलविल्यास प्रकल्पच होणार नसल्याची भूमिका मेट्रो प्रशासनाने घेतली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडेंवर जोरदार टीका केली होती.''अश्विनी भिडे व त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांना ‘आरे’च्या कारशेडशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण करता येणार नसेल तर अशा अधिकाऱ्यांना बाजूला करावे. त्यांच्या जागी सक्षम व मुंबईकरांना विश्वासात घेऊन काम करणाऱ्यांकडे प्रकल्प द्यावा, अशी मागणीही आदित्य यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मात्र आता शिवसेनेची सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेने अश्विनी भिडे यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली आहे.
अश्विनी भिडे यांना राज्याच्या प्रधान सचिवपदी बढती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 14:40 IST