पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा
By Admin | Updated: September 12, 2014 14:19 IST2014-09-12T11:54:33+5:302014-09-12T14:19:00+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीतील पेड न्यूजप्रकरणामुळे गोत्यात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना शुक्रवारी दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे.

पेड न्यूजप्रकरणी अशोक चव्हाणांना दिलासा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - गेल्या विधानसभा निवडणुकीतील पेड न्यूजप्रकरणामुळे गोत्यात आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना शुक्रवारी दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पेड न्यूजप्रकरणी निवडणूक आयोगाने अशोक चव्हाणांना दिलेली कारवाईची नोटीस चुकीची असल्याचे दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
२००९च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पेड न्यूज दिल्याची तक्रार डॉ. माधव किन्हाळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगानेही याप्रकरणी चव्हाण यांना नियमापेक्षा जास्त खर्च केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या निर्णयाला अशोक चव्हाण यांनी दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टाने शुक्रवारी निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस चुकीची असल्याचे सांगत नोटीस रद्द केली. यामुळे चव्हाणांना दिलासा मिळाला आहे. माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप करणा-या विरोधकांना या निर्णयातून चोख प्रत्युत्तर मिळाले असून अखेर सत्याचाच विजय झाला अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तर तक्रारदार डॉ. माधव किन्हाळकर यांनी अद्याप हायकोर्टाच्या निकालाची प्रत उपलब्ध झालेली नाही. मात्र या वृत्तामध्ये तथ्य आढळल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ असे सांगितले.