महिलांसाठी शिवनेरीत आसने आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2015 01:24 IST2015-06-21T01:24:14+5:302015-06-21T01:24:14+5:30
शिवनेरीत महिलांसाठी दहा आसने आरक्षित ठेवण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. त्याचबरोबर नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी

महिलांसाठी शिवनेरीत आसने आरक्षित
मुंबई : शिवनेरीत महिलांसाठी दहा आसने आरक्षित ठेवण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. त्याचबरोबर नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी २,२00 बसचे नियोजन करण्यात आले आले असून एसटी महामंडळ सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या चर्चेला विराम देत दिवाकर रावते यांनी शनिवारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रावते बोलत होते. शिवनेरी बस मुंबई-पुणे, औरंगाबाद-पुणेसह अन्य मार्गांवर धावत असून त्यामधून मोठ्या प्रमाणात महिला प्रवास करतात. हे पाहता त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी हा निर्णय घेत असल्याचे रावते यांनी सांगितले. याची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.
त्याचबरोबर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महामंडळ सज्ज असल्याचे सांगत २ हजार २00 बसचे नियोजन करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली. कुंभमेळ्यासाठी सहा नवीन बस स्थानके बांधण्यात आली असून कर्मचाऱ्यांही मोठ्या प्रमाणात नियुक्ती केली जाणार असल्याचे रावते म्हणाले.
हिरकणीत ‘पुश-बॅक’ आसने
सध्याच्या हिरकणी (निम-आराम) बसमधील आसनव्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आसन व्यवस्था ‘पुश बॅक’ (मागे होणारी आसने) केली जाणार असून त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल, असा दावा रावते यांनी केला. येत्या तीन महिन्यात यातील ३0 बस लवकरच दाखल होतील.
एसटीत आता मराठी बाणा
एसटीत आता मराठी बाणा दिसून येणार आहे. इंग्रजीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या पाट्या नियमानुसार मराठी करण्यात येणार आहेत. तसे शासनाचे आदेश असून त्याची अंमलबजावणी एसटीत केली जाणार आहे.