Jayant Patil Shashikant Shinde NCP : महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा नव्या शिलेदाराकडे सोपवण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. खुद्द खासदार शरद पवार यांनीच त्यांच्या नावाची घोषणा केली. आता शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला दमदार कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. त्यांच्या निवडीवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही एक्स वर पोस्ट केली आहे.
मावळते प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?
"माझे सहकारी, विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर चालणार्या पक्षाचा "सर्वसामान्य कार्यकर्ता" हा गाभा आहे. मागच्या काळात आपला पक्ष तळागाळापर्यत पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी मिळून केले. आपण हा पक्ष त्यापेक्षा अधिक बळकट कराल असा मला विश्वास आहे. त्यासाठी आपल्याला खुप खुप शुभेच्छा," असा शब्दांत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून जयंत पाटलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कशी झाली निवड?
आज मुंबईत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह इतरही अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भाषण केले. अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.