Maharashtra Political News: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या झालेल्या दारूण पराभवाबाबत संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे. यावरून भाजपासह महायुतीचे नेते ठाकरे गटावर सडकून टीका करत आहेत. विशेष म्हणजे या टीकेची धार राज ठाकरे यांच्याबद्दल अतिशय सौम्य असलेली पाहायला मिळत आहे. या घडामोडी सुरू असतानाच राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. सुरुवातीला ही भेट कशासंदर्भात होती, याबाबत बरेच तर्क लढवण्यात आले. परंतु, लगेचच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीमागील कारण सांगितले. परंतु, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. एनडीएचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना विजयी करण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे संजय राऊतांनी सांगितले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. मतांसाठी विनंती करणे हे त्यांचे कामच आहे, असे संजय राऊत म्हणाले. राजकीय मतभेद असले तरी, उपराष्ट्रपतीपदासारख्या महत्त्वाच्या निवडणुकीसाठी दोन्ही बाजूंचे नेते संपर्क साधत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विशेष समन्वयक म्हणून जबाबदारी दिल्याचे समजते. देवेंद्र फडणवीस हे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराविरुद्ध पाठिंबा मिळवण्यासाठी अनेकांशी संपर्क साधत आहेत. महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी महाराष्ट्रातील माणूस उपराष्ट्रपती होतोय, त्यामुळे त्यांना मतदान करायला हवे. माझे महाराष्ट्रातील इतर पक्षांना आवाहन आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्हीही गटांनी सी. पी. राधाकृष्णन यांना समर्थन द्यायला हवे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.