अरुण साधू यांना जनस्थान पुरस्कार
By Admin | Updated: January 25, 2015 01:43 IST2015-01-25T01:43:19+5:302015-01-25T01:43:19+5:30
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे.

अरुण साधू यांना जनस्थान पुरस्कार
नाशिक/मुंबई : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा मानाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याबाबतची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी शनिवारी मुंबईत पत्रपरिषदेत केली़ कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे़
ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. विलास खोले यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शनिवारी मुंबईत बैठक झाली. बैठकीत साधू यांची एकमताने निवड करण्यात आली. या समितीत सुनील तांबे, जयंत पवार, मोनिका गजेंद्रगडकर (मुंबई), राजन खान, रेखा साने (पुणे), सतीश बडवे (औरंगाबाद), डॉ. अक्षयकुमार काळे (नागपूर) यांचा समावेश होता.
आतापर्यंत विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२००१), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे (२०१३) यांना ‘जनस्थान’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार दर दोन वर्षांनी दिला जातो़ (प्रतिनिधी)
‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’ या अरुण मार्तंडराव साधू यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या. अमरावती जिल्ह्णातील परतवाडा येथे जन्मलेल्या साधू यांनी प्रारंभी केसरी, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स आॅफ इंडिया, द स्टेटसमॅन आदि वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली. ‘फ्री प्रेस जर्नल’चे संपादक म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. नंतर पत्रकारिता सोडून ते स्तंभलेखन व कादंबरी लेखनाकडे वळले. ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’मधून त्यांनी महानगरीय वास्तव जीवन व महाराष्ट्रातील राजकारणाचा टोकदार वेध घेतला. या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले.
याशिवाय सत्तांध, बहिष्कृत, शापित, स्फोट, विप्लवा, त्रिशंकू, शोधयात्रा, तडजोड, झिपऱ्या, मुखवटा या कादंबऱ्या, माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्रजागर, बेचका हे कथासंग्रह, पडघम, प्रारंभ, बसस्टॉप आदि एकांकिका, काकासाहेब गाडगीळ, महाराष्ट्र : लॅँड अॅण्ड पिपल (इंग्रजी), अक्षांश-रेखांश, निश्चिततेच्या अंधारयुगाचा अंत, संज्ञापन क्रांती-स्वरूप व परिणाम, पत्रकारितेची नीतिमूल्ये आदि ललितेतर पुस्तके आणि ड्रॅगन जागा झाला, फिडेल आणि क्रांती, तिसरी क्रांती, ड्रॅगन जागा झाल्यावर आदी समकालीन इतिहासावरील पुस्तकांचा समावेश आहे.