अरुण गवळीला रजा नाहीच, संचित रजेस अपात्र
By Admin | Updated: March 8, 2017 19:15 IST2017-03-08T19:14:26+5:302017-03-08T19:15:27+5:30
सुधारित नियमानुसार मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी हा संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी अपात्र आहे

अरुण गवळीला रजा नाहीच, संचित रजेस अपात्र
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8 - सुधारित नियमानुसार मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी हा संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी अपात्र आहे. त्याला संचित रजा मंजूर केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याची संचित रजेची याचिका खारीज करण्यात यावी, असे उत्तर राज्य शासनाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले.
शासनाने अभिवचन रजा (पॅरोल) व संचित रजा (फरलो) नियमामध्ये सुधारणा केली असून, त्यासंदर्भात २८ आॅगस्ट २०१६ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असेल आणि हे अपील प्रलंबित असेल तर, सदर आरोपीला संचित रजा दिली जाणार नाही अशी तरतूद नियम ४(११) मध्ये करण्यात आली आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या शिक्षेविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. हे अपील प्रलंबित आहे. परिणामी त्याला संचित रजा दिली जाऊ शकत नाही असे शासनाच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
गवळीने संचित रजेसाठी सुरुवातीला कारागृह उपमहानिरीक्षकाकडे अर्ज सादर केला होता. निवडणुकीचे दिवस असल्याचे कारण देऊन त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. या निर्णयाला गवळीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होईल. गवळीला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. गवळीतर्फे अॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.