अरुण गवळीला पॅरोल नाही
By Admin | Updated: September 20, 2016 20:12 IST2016-09-20T20:12:28+5:302016-09-20T20:12:28+5:30
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीच्या आजारी पत्नीवर शस्त्रक्रिया करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही

अरुण गवळीला पॅरोल नाही
ऑलनाइन लोकमत
नागपूर, दि. २० : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडीच्या आजारी पत्नीवर शस्त्रक्रिया करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी डॅडीला पॅरोल (अभिवचन रजा) नाकारून संबंधित रिट याचिका निकाली काढली.
न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. आजारी पत्नीवर शस्त्रक्रिया करायची असल्याचे कारण सांगून डॅडीने सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी अर्ज फेटाळून लावला. यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डॅडीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती.