संवेदनशील चिमुकल्यांची ‘थॅलसेमिया’ रुग्णांना कलात्मक मदत
By Admin | Updated: July 13, 2014 00:56 IST2014-07-13T00:56:55+5:302014-07-13T00:56:55+5:30
लहान मुले कुणाला काय मदत करू शकतात, असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात येतो. पण लहान मुलांनी ठरविले आणि त्यांना प्रोत्साहन मिळाले, मोठ्यांची थोडीशी मदत लाभली तर मुलेही

संवेदनशील चिमुकल्यांची ‘थॅलसेमिया’ रुग्णांना कलात्मक मदत
आईने दिले प्रोत्साहन : लोकमत परिवाराच्या पुढाकाराने मुलांच्या पेंटिंगचा लिलाव
नागपूर : लहान मुले कुणाला काय मदत करू शकतात, असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात येतो. पण लहान मुलांनी ठरविले आणि त्यांना प्रोत्साहन मिळाले, मोठ्यांची थोडीशी मदत लाभली तर मुलेही मोठे काम करू शकतात, याचा प्रत्यय आज आला. शालेय विद्यार्थी कलावंतांनी आपल्या प्रतिभेने चित्रे काढली आणि या चित्रांच्या लिलावातून मिळालेला निधी ‘थॅलसेमिया’ रुग्णांच्या उपचारासाठी देण्याची घोषणा केली. मुलांच्या या संवेदनशीलतेने उपस्थित लोकही भारावले.
लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा गॅलरीत या मुलांनी काढलेल्या या चित्रांचा लिलाव लोकमतच्या पुढाकाराने करण्यात आला. मुलांची चित्रे विकत घेण्यासाठी शहरातील मान्यवर चित्ररसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशोवर्धन कोठारी, ध्रुव झवेरी आणि आदित्य सुनदेशा, ही मुंबई येथे राहणारी शाळकरी मुले. उन्हाळ्याच्या सुटीत ही मुले नागपुरात नातेवार्इंकाकडे आलीत. काहीतरी चांगले शिकायचे म्हणून त्यांचा प्रयत्न होता. तिघांनाही चित्रकलेची आवड असल्याने आवडीनिवडी जुळल्या. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीला त्यांनी भेट दिली. यातूनच या मुलांनी चित्रांच्या, पेंटिंगच्या माध्यमातून आपली संवेदनशीलता व्यक्त केली. शाळकरी मुले असली तरी त्यांच्या चित्रांचे स्ट्रोक्स आणि रंगसंगती, चित्रामागची कल्पना, संकल्पना सफाईदार आहे. रंगांच्या या कुंचल्यातून मानवी भावनांचा पट त्यांनी कल्पनाशक्तीने उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ही बाब लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा यांच्या लक्षात आली. या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून चित्रांची विक्री करावी आणि त्यातून मिळालेला निधी थॅलसेमिया रुग्णांसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय या मुलांनी घेतला होता. खा. विजय दर्डा यांनी पुढाकार घेत मुलांच्या या चांगल्या भावनेला बळ दिले. त्यांनी मुलांनी काढलेल्या चित्रांची विक्री लिलावाच्या माध्यमातून करण्याची संकल्पना मांडली आणि त्यासाठी पुढाकार घेत लिलाव आयोजित केला. चित्राच्या जाणकार, रसिकांना आमंत्रित करण्यात आले. या लिलावाला शहरातील रसिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. लिलावात मुलांनी काढलेली सर्व चित्रे विकली गेली त्यामुळे तिन्ही छोटे चित्रकार खूश झाले.
खा. विजय दर्डा यांची क न्या पूर्वा कोठारी यांनी अलीकडेच लाईफ लाईन रक्तपेढीला भेट दिली. रक्तपेढीचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी पूर्वा कोठारी यांना रक्तपेढीची माहिती देऊन या क्षेत्रातील आव्हानांची माहिती दिली. रक्तपेढीत नव्यानेच घेतलेल्या नॅट मशीनबाबत सांगितले. ही मशीन पाहिल्यावर थॅलसेमिया रुग्णांना मदतीची गरज असल्याचे पूर्वा कोठारी यांच्या लक्षात आले. संवेदनशील पूर्वा कोठारी यांच्या मनात हा विषय घोळत होताच. थॅलसेमिया रुग्णांसाठी काय करता येऊ शकेल, याचा विचार करीत असतानाच त्यांनी सहजच आदित्य, ध्रुव आणि यशोवर्धनजवळ हा विषय सांगितला. यातून मुलांच्या मनात एक कल्पना आली आणि तिघांनीही थॅलसेमिया रुग्णांसाठी पेंटिंग काढण्याचे ठरविले. त्याच्या विक्रीतून येणारा निधी थॅलसेमिया रुग्णांना मदत म्हणून देण्याचे ठरविले आणि यातूनच मार्ग निघत गेला. मुलांच्या या मदतीने थॅलसेमिया रुग्णांचे सर्व प्रश्न कदाचित सुटणार नाहीत पण मुलांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि त्यासाठी केलेली प्रत्यक्ष कृती इतरांना प्रेरणा देणारी आहे.
याप्रसंगी मातोश्री उषादेवी दर्डा आणि खा. विजय दर्डा प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुलांनी त्यांच्या चित्र काढण्यामागील संकल्पना सांगितल्या. मुलांचा हा प्रयत्न पाहून पूर्वा कोठारी यांनीही एक कुंचला साकारला. त्यांनी प्रथमच साकारलेल्या पेंटिंगचीही अनेकांनी प्रशंसा केली. त्यांचेही चित्र विकत घेण्यासाठी उपस्थितांमध्ये स्पर्धा निर्माण झाली होती.