कापूस बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा!

By Admin | Updated: July 1, 2014 00:51 IST2014-07-01T00:51:29+5:302014-07-01T00:51:29+5:30

विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता,

Artificial scarcity of cotton seeds! | कापूस बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा!

कापूस बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा!

शेतकऱ्यांची वणवण : कृषी विभागाचे मौन
नागपूर : विदर्भात अजूनपर्यंत पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाला नसला, तरी शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू केली आहे. गतवर्षी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान पाहता, यंदा अनेकांनी कापूस लागवडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात अचानक कापूस बियाण्याची मागणी वाढली आहे. परंतु काही दुकानदार या संधीचा गैरफायदा घेऊन अधिक मागणी असलेल्या कापूस बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करीत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
माहिती सूत्रानुसार सध्या बाजारात अजित-१५५ व अजित-१९९ या वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु गत काही दिवसांपासून या दोन्ही वाणांचा संपूर्ण जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या मते, काही दुकानदार अजित-१५५ किंवा अजित-१९९ हवे असल्यास, त्यासोबत इतर बियाणे घेण्याची अट घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होत असून, त्यांना दुकानदारांच्या साठेबाजीला बळी पडावे लागत आहे. वास्तविक कृषी विभागाने यापूर्वीच ‘मागेल त्याला मुबलक बियाणे’ मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या बाजारात त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे.
त्यापैकी कृषी विभागाने यंदा सोयाबीनसाठी २ लाख २२ हजार ४४८ हेक्टर, कापसासाठी १ लाख २४ हजार ६६५, भात ७८ हजार ८१२, ज्वारी ४ हजार ९९२, मका ५८८, भुईमुग २ हजार ८१५ व तूर पिकाचे ४४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. परंतु प्रत्यक्षात कापसाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Artificial scarcity of cotton seeds!