ऊठ मराठ्या, मोदी (ज्यु) आले!

By Admin | Updated: June 2, 2014 07:01 IST2014-06-02T06:35:06+5:302014-06-02T07:01:45+5:30

असं म्हणतात की, पूर्वी नाटकाची जाहिरात करताना नाटकातील सार्‍या नट-नट्यांची नावे लिहून झाली की, शेवटी अत्यंत ढोबळ्या अक्षरात

Artha Maratha, Modi came! | ऊठ मराठ्या, मोदी (ज्यु) आले!

ऊठ मराठ्या, मोदी (ज्यु) आले!

हेमंत कुलकर्णी - असं म्हणतात की, पूर्वी नाटकाची जाहिरात करताना नाटकातील सार्‍या नट-नट्यांची नावे लिहून झाली की, शेवटी अत्यंत ढोबळ्या अक्षरात ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ ही अक्षरे लिहिली रे लिहिली की, प्रयोग हाऊसफुल्ल झालाच समजा! आताही बहुधा तेच आणि तसेच होईल़ विधानसभेची सारी बाके राजबाबूंच्या निष्ठावान मावळ्यांनी भरून जातील, अशी आशा (वेडी?) आणि अपेक्षा राजबाबू ठाकरे आणि त्यांच्या समस्त मावळेगणांच्या मनात उपजली असणार, याबाबत या मºहाटी मुलुखातील तमाम मराठ्यांनी नि:शंक राहण्यास हरकत नाही. श्वशुर मोहन वाघ यांच्या कन्येचा स्वीकार करतानाच राज ठाकरे यांनी श्वशुरांकडचे जाहिरात कौशल्य तर आत्मसात केलेच असणार, पण ज्या ठाकरे कुटुंबात जन्म घेतला, ते कुटुंबदेखील कोणत्याही लहान-मोठ्या निमित्तात नाट्यमयता ओतण्यात तसे तरबेजच. साहजिकच, लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आणि मनसेचा निकाल लागल्यानंतर तब्बल  २ पंधरवड्यानंतर ‘चला, आयुष्यावर बोलू काही’ अशा धर्तीची जाहिरातबाजी सुरू झाली. त्यासाठी ३१ मेचा मुहूर्त शोधूून काढला गेला. (३१-५, अरेवा, ९ची बेरीज झाली की!) लोकाना वाटले, आपण नाकारल्याचा राग येऊन राजबाबू चक्क राजकारण संन्यासबिन्यास जाहीर करून मोकळे होतात की काय! कारण गेल्या काही महिन्यांपासूनची त्यांची पुण्यातली आणि नाशकातली भाषा तशीच होती. पण नाही! महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीत मनसे सर्व ताकदीनिशी उतरणार आणि मायबाप जनतेने कौल दिला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद देखील साक्षात आपणच स्वीकारणार, अशी घोषणाच या ‘बोलू काही’मध्ये केली गेली. त्या वेळी तिथे जमलेल्या मनसे झुंडीला ही घोषणा म्हणजे साक्षात बॉम्बगोळाच वाटला. असो. बॉम्ब देखील त्याच्याकडे बघण्याच्या दृष्टीबरहुकूम महा अथवा लघुरूप धारण करीत असतो. आता एवढी मोठी घोषणा केली म्हटल्यानंतर राज्य विधानसभेत २८८ जागा आहेत़ त्यातील किमान १४५ आपण जिंकल्याच पाहिजेत़ त्यासाठी अवघ्या महाराष्ट्रात आपली ताकद अगोदरपासूनच उभी राहिलेली असली पाहिजे़ मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक इथल्या चिमुकल्या शिदोरीवर उभ्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे स्वप्न बघता येत नाही, इत्यादी इत्यादीचा विचार राज यांनी नक्कीच केला असणार. (हे स्वप्न साकारायचे तर सकाळी लवकर उठून रात्री उशिरा निजावे लागेल़ कार्यकर्त्यांशी सतत हिडीसफिडीस करता येणार नाही, वगैरे समजुतीच्या आणि अनुभवाच्या चार गोष्टी शरदकाका सांगतीलच) एक बरीक खरे. राज ठाकरे म्हणतात, त्यानुसार कोणत्याही निवडणुकीत कुणीही जिंकत नसतो तर कुणीतरी पराभूत होत असतो. महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीचा विचार करता, निवडणूक तोंडाशी नव्हे तर चक्क घशाशी आलेली असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची जी हमरीतुमरी सुरू आहे, ती पाहू जाता हे दोन्ही पक्ष पराभव स्वीकारायला आणि पचवायला किती उत्सुक आणि उतावीळ झाले आहेत, हेच दिसून येते. या पार्श्वभूमीवर आणि विशेषत: लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी म्हटले, तर चक्क नाकारल्यानंतर आणि तूर्तास तसे कोणतेही वातावरण नसताना राज यांच्या हाकेला इतक्या मोठ्या संख्येत त्यांच्या चाहत्यांनी ओ द्यावी, हे विशेषच मानावे लागेल. अर्थात पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांचे काहीसे खचलेले मनोधैर्य उंचावण्यासाठी अशी सभा आयोजित करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे यासाठी एखादी चमकदार घोषणा करणे ही स्वत: राज आणि त्यांच्या मनसेची गरजच होती, हे येथे लक्षात घ्यावे लागेल़ तथापि लोकसभा निवडणुकीत देशस्थिती जशी केवळ मोदी यांनाच अनुकूल होत गेली तसे महाराष्ट्राच्या बाबतीत नाही. ‘मॅच इज प्रिटी ओपन फॉर आॅल’! पण मोदींच्या मागे पंधरा वर्षांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द होती आणि त्यांनी विकासाचा नारा ओठावर रुळवून घेतला होता. तुलनेत राजबाबूंच्या हाती एव्हाना बहुधा जीर्ण झालेल्या महाराष्ट्राच्या चौमुखी विकासाच्या ‘नीलपत्रिकेची’ काही पाने आणि बट्ट्याबोळ झालेला नाशिक महापालिकेचा कारभार इतकेच आहे. तरीही राज ठाकरे महाराष्ट्राचे मोदी (ज्यु) बनण्याची आस बाळगून असतीलच तर किमान त्यांच्या या धार्ष्ट्याचे कवतिक करायला काय हरकत आहे?

Web Title: Artha Maratha, Modi came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.