कला महाविद्यालयांना बसणार चाप
By Admin | Updated: April 4, 2017 03:05 IST2017-04-04T03:05:04+5:302017-04-04T03:05:04+5:30
राज्यातील काही कला महाविद्यालयांत सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाला आळा बसावा

कला महाविद्यालयांना बसणार चाप
मुंबई : राज्यातील काही कला महाविद्यालयांत सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाला आळा बसावा, विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क आकारणी न करताही सर्व सोयी -सुविधा मिळाव्यात यासाठी सोमवारी कला संचालनालयाने कला महाविद्यालयाची झाडाझडती घेण्याचा निर्णय जाहीर केला. कला महाविद्यालयात गोंधळ आढळून आल्यास कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याने महाविद्यालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
राज्यात कला संचालनालयाच्या अखत्यारीत २०२ आर्ट्स महाविद्यालये येत असून १७१ विनाअनुदानित तर ३१ अनुदानित तत्त्वावर चालवली जात आहेत. कला महाविद्यालयात आकारल्या जाणाऱ्या शुल्कात मोठ्या प्रमाणात फरक आढळून येतो. पण अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. याविषयी विद्यार्थी तक्रार करतात, पण तरीही विद्यार्थ्यांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. अशा तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने कला संचालकांकडे केल्या होत्या. महाविद्यालयात वाचनालयात उपयुक्त पुस्तके नाहीत. काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी कॉमन रूम नाहीत. मान्यताप्राप्त शिक्षक नाहीत. अशा तक्रारींची दखल घेत सोमवारी कला संचालनालयात कला संचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. या बैठकीत कला संचालक डॉ. राजीव मिश्रा, मनविसेचे संतोष गांगुर्डे, प्रशांत अनासन उपस्थित होते. महाविद्यालयांची पडताळणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)