अर्शद राज्यात पहिला

By Admin | Updated: March 14, 2015 00:37 IST2015-03-14T00:37:20+5:302015-03-14T00:37:45+5:30

‘पीएसआय’चा निकाल : कोल्हापूर जिल्ह्यातील २३ जणांनी रोवला यशाचा झेंडा

Arshad is the first in the state | अर्शद राज्यात पहिला

अर्शद राज्यात पहिला

कोल्हापूर / पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१३मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदासाठीच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत कोल्हापुरातील सुभाषनगर येथील अर्शद उस्मान मकानदार याने ३४० पैकी २५८ गुण मिळवीत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला, तर महिलांमध्ये औरंगाबाद येथील नीता केरबाजी कदम हिने पहिला क्रमांक पटकावला. जिद्दीला कष्टाची जोड देत कोल्हापूर जिल्ह्यातील २३ विद्यार्थ्यांनी पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला. शिंदेवाडी (ता. तासगाव) येथील अनिरुद्ध चव्हाणने २४५ गुणांसह राज्यात आठवा, तर साजणी (ता. हातकणंगले) येथील धन्वेश पाटीलने २३७ गुणांसह ५२ वा क्रमांक मिळविला. ‘एमपीएससी’तर्फे आॅगस्ट २०१३ मध्ये पीएसआयची पूर्वपरीक्षा झाली. त्यानंतर डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा आणि डिसेंबर २०१४ मध्ये मुलाखती, शारीरिक चाचणी परीक्षा झाली. यात सुभाषनगरमधील अर्शद मकानदार राज्यात अव्वल ठरला. त्याने या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेजमध्ये झाले आहे.
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून अर्शदने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळविली आहे. त्याचे वडील कृषी खात्यातून सहायक अधीक्षकपदावरून निवृत्त झाले असून, तर आई आयेशा या पुलाची शिरोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. राज्यात आठवा आलेला अनिरुद्ध चव्हाण आणि ५२ वा क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या धन्वेश पाटीलने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळविले. जिल्ह्यातील अन्य यशस्वी उमेदवार असे - (गाव आणि मिळालेले गुण) : अश्विनी केर्ले (शंकरवाडी, ता. कागल) १९५), सुनीता भोसले (नेसरी, १७३), मनोज पाटील (देवाळे, २३१), राहुल संकपाळ (गडमुडशिंगी, करवीर २०२), दीपाली पाटील (कावणे, करवीर १९८), स्नेहल आडसूळ (राजारामपुरी बारावी गल्ली, कोल्हापूर २०२), सुरेखा गोतोडे (इचलकरंजी, १३७), नितीश पोटे (इचलकरंजी), दीपक बारस्कर (केदार पुतळे, राधानगरी), शेषराज मोरे (संभाजीनगर, कोल्हापूर), दिनेश चव्हाण (सुभाषनगर, कोल्हापूर), पूनम चव्हाण (पुनाळ, ता. पन्हाळा), कुमार ढेरे, तेजश्री अतिग्रे (रजपूतवाडी, ता. करवीर १६०), गुरुप्रसाद ढेपाळे (सावर्डे खुर्द कागल), संदीप जाधव (नावली, पन्हाळा १२८), जयश्री नवलगे (गडहिंग्लज), प्रियांका गायकवाड (आळवे, पन्हाळा), रामदास जाधव (सावरवाडी, ता. करवीर, ११८), सुजिता चव्हाण (नंदगाव), मयूरी गोटे (कसबा वाळवे, ता. राधानगरी). दरम्यान, ‘आॅनलाईन’ निकाल पाहण्यासाठी नेट कॅफे, इंटरनेटची सुविधांच्या ठिकाणी उमेदवारांनी गर्दी केली. यशस्वी उमेदवारांवर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. परीक्षेत कोल्हापुरातील स्टडी सर्कलच्या ११, ए. बी. फौंडेशनच्या ३१ व युनिक अकॅडमीच्या चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. (प्रतिनिधी)

साजणी (ता. हातकणंगले) हे मूळ गाव, घरची परिस्थिती बेताची, बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एम.एस्सी.ला प्रवेश घेतला होता. आजारी पडल्यामुळे एम.एस्सी. पूर्ण करता आले नाही. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडे वळलो. आॅगस्ट २०१३ मध्ये पी.एस.आय.ची पूर्वपरीक्षा, तर डिसेंबर २०१३ मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो. ५ डिसेंबर २०१४ रोजी शारीरिक चाचणीत व मुलाखतीमध्येही यशस्वी होत राज्यात ५२ वा क्रमांक पटकावला. स्टडी सर्कलचे आनंद पाटील, राहुल पाटील, वैशाली पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
- धन्वेश पाटील, पीएसआय

आई, वडील, काका अकबर असे कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच या क्षेत्रातच करिअर करण्याचे ध्येय बाळगले होते.राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत अपयश आले; पण त्यावर खचून गेलो नाही. पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. दिवसातील आठ ते नऊ तास अभ्यास केला. स्वयंअध्ययनावर भर दिला. त्याचा परिणाम म्हणजे पहिल्याच प्रयत्नात पी. एस. आय. परीक्षेत यशस्वी झालो. खूप आनंद वाटत आहे. परीक्षेची भक्कम तयारी केल्यानेच यश मिळाले आहे.
- अर्शद मकानदार

महिलांमध्ये औरंगाबादची नीता कदम पहिली
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१३मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या (पीएसआय) मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत महिलांमध्ये औरंगाबाद येथील नीता केरबाजी कदम हिने पहिला क्रमांक पटकावला.
पोलीस उपनिरीक्षकांच्या ७१४ पदांसाठी आयोगाने ८ डिसेंबर २०१३ रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. १५ महिन्यांच्या कालावधीनंतर अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यात अर्शदला सर्वाधिक २५७ गुण मिळाले असून, तो इतर मागासवर्ग प्रवर्गातील आहे. नीताला २२९ गुण मिळाले.
सचिन बराटे हा २५१ गुण मिळवत राज्यात दुसरा, तर सुनील बोडखे हा २५० गुण मिळवत तिसरा आला. अनुसुचित जाती प्रवर्गातून चंद्रकांत कदम २२६ गुणांसह प्रथम आला आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गातून गणेश रायकरने पहिला क्रमांक पटकावला. त्याला २३० गुण मिळाले आहेत. खुल्या प्रवर्गासाठी २२७ गुणांचा कट आॅफ जाहीर केला आहे. अनुसुचित जातीसाठी २०८, तर अनुसूचित जमातीसाटी १९४ गुणांचा कट आॅफ लावण्यात आला आहे. ओबीसीसाठी २१४ गुणांचा कट आॅफ आहे.


अर्शदने स्पर्धा परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत कार्यरत राहावे असे आमच्या कुटुंबाचे स्वप्न होते. त्याने जिद्द, परिश्रमाने अभ्यास करून आमचे नाव उज्ज्वल केल्याचा आनंद आम्हा सर्वांना आहे.
- उस्मान मकानदार
(अर्शदचे वडील)

Web Title: Arshad is the first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.