मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचं आगमन

By Admin | Updated: May 29, 2017 15:29 IST2017-05-29T15:29:10+5:302017-05-29T15:29:10+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. सोमवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण आहे.

The arrival of monsoon rains in Mumbai | मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचं आगमन

मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचं आगमन

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबई शहर आणि उपनगरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. सोमवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण आहे. यादरम्यान सकाळच्या सुमारास मुंबईत काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. 
डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
 
पावसाच्या सरींमुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला आहे.  
 
(२, ३, ४ जूनला राज्यात मुसळधार)
मान्सूनचे ३१ मेपर्यंत केरळमध्ये आगमन झाल्यानंतर तो वेगाने पुढे सरकणार असून २, ३, ४ जून रोजी राज्यात चांगला पाऊस होईल, तसेच राज्यात हंगामात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
(पाऊसधारांमुळे विदर्भातील जनतेला दिलासा)
 
पश्चिमी वाऱ्याच्या जोरामुळे आणि द्रोणीय क्षेत्र उत्तरेकडे सरकल्याने नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच ३०-३१ मेपर्यंत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कॅमरीन क्षेत्र आणि दक्षिण केरळमध्ये होण्याच्या दृष्टीने स्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़ राज्यात २, ३ व ४ जून दरम्यान, ज्या ठिकाणी ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस होईल, तेथे पेरण्या लवकर करण्यास हरकत नाही़ या वर्षी वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने, २० जून ते १० जुलैच्या दरम्यान पावसात खंड पडेल़ विदर्भ व मराठवाड्यात खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता आहे़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले़
 
अंदमानच्या समुद्रात नेहमीपेक्षा अगोदर आलेल्या मान्सूनचा मुक्काम अंदमानच्या समुद्रात बरेच दिवस होता़ दरवर्षी २५ मेपर्यंत श्रीलंकेपासून म्यानमारपर्यंत मान्सून येतो़ गतवर्षी राज्यात मान्सूनचे आगमन पूर्वेकडून झाले होते़ यंदा मात्र, अरबी समुद्रातील वाऱ्यांचा जोर अधिक असल्याने शुक्रवारी त्याने श्रीलंकेत प्रवेश करताना जोरदार तडाखा दिला आहे़
 
ठळक नोंदी...
 
- जुलैच्या पहिल्या आठवड्यात खंड पडण्याची शक्यता. यवतमाळला अतिवृष्टी होण्याची शक्यता.
 
- राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश या परिसरात अतिवृष्टी, तर काश्मीर, उत्तर प्रदेश या पट्ट्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
 
- पुढील वर्षापासून औरंगाबाद, नांदेडचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न.
 
विदर्भात उष्णतेची लाट...
 
राज्यात विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे़ रविवारी दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २९ ते ३१ मेपर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़
 

Web Title: The arrival of monsoon rains in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.