बाप्पाच्या आगमनाने मुंबापुरी दुमदुमली
By Admin | Updated: August 22, 2016 01:59 IST2016-08-22T01:59:53+5:302016-08-22T01:59:53+5:30
संकष्टी आणि रविवार अशा दुहेरी मुहूर्तावर मुंबईतील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचा आगमन सोहळा पार पाडला.

बाप्पाच्या आगमनाने मुंबापुरी दुमदुमली
मुंबई : संकष्टी आणि रविवार अशा दुहेरी मुहूर्तावर मुंबईतील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचा आगमन सोहळा पार पाडला. महाराजा, कैवारी आणि राजा अशा नाना रूपांतील उंच आणि आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी मुंबईकरांनी लालबाग, परळ, चिंचपोकळी आणि भायखळा परिसरात तुफान गर्दी केली होती. या वेळी ढोल-ताशाच्या तालावर स्वार झालेल्या कार्यकर्त्यांसोबत गणेशभक्तांनीही आगमन सोहळ्यात एकच कल्ला केल्याचे चित्र दिसले.
चिंचपोकळीच्या चिंतामणीसह ग्रँटरोडचा राजा, करी रोडचा कैवारी, गिरणगावातील घोडपदेवचा राजा, खेतवाडीच्या ११व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा, जिजामातानगरचा राजा अशा नामांकित गणेशोत्सव मंडळांतील बाप्पांचा आगमन सोहळा रविवारी पार पडला. पुणेरी ढोल, नाशिक बाजा, बेन्जो आणि डीजेच्या आवाजाने अक्षरश: मुंबापुरी दुमदुमली होती. प्रत्येक मंडळामध्ये तरुण-तरुणींनी संख्या वाखाणण्याजोगी होती. दुपारच्या वेळी बहुतेक मंडळांनी कार्यशाळांतून गणपतीची मूर्ती बाहेर काढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गांनी वळवण्यात आली. (प्रतिनिधी)
>छायाचित्रकारांची मांदियाळी
‘चिंचपोकळीचा चिंतामणी’सह दर्शनासाठी जमलेल्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी शेकडो नवोदित छायाचित्रकारांसह अनुभवी छायाचित्रकारांनीही गर्दी केली होती.
आगमन सोहळ्यातील बारकावे आणि गणेशभक्तांचे हावभाव टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी उड्डाणपुलापासून येथील रस्त्यालगतच्या इमारतींच्या गच्चीचा आधार घेतला होता. काही छायाचित्रकार तर झाडांसह मिळेल त्या उंच ठिकाणांवर चढून छायाचित्र घेत होते.
>पताकांचा नयनरम्य नजारा
परळवरून चिंचपोकळी येथील मंडपाच्या दिशेने निघालेला ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ हा विशेष आकर्षण ठरला. या आगमन सोहळ्यात विविध ढोलपथकांनी ‘चिंतामणी’ला सलामी दिली.
ढोलाच्या नादावर भगवी पताका नाचवणारे कार्यकर्ते सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते; तर पताका नाचवली जात असताना तरुण-तरुणीही त्या तालावर थिरकताना दिसले.