ठाणे : पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका २८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत साडेपाच लाखांच्या खंडणीची मागणी करणा-या विश्वास आणि शोभा गोरे या दाम्पत्याला कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्यांना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.आपण आरटीआय कार्यकर्ता असल्याचा दावा करत विश्वासने एका शासकीय कार्यालयात काम करणा-या या पीडित महिलेचा २०१५ ते २० जुलै २०१७ या कालावधीत वेगवेगळी माहिती मागवण्याच्या नावाखाली मानसिक छळ केला. त्याच नावाखाली तो तिच्याकडे शरीरसुखाची मागणीही करत होता. या सर्व प्रकाराला विरोध केल्यानंतर त्याने पती आणि मुलाला ठार मारण्याची तसेच नोकरीही घालवण्याची तिला धमकी दिली. पुढे ठाण्यातील एका लॉजवर बोलवून तिथे लैंगिक अत्याचार केल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याच अत्याचाराचे फोटो त्याच्या पत्नीने पीडित महिलेच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून तिच्याकडेच साडेपाच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. ही रक्कम न दिल्यास पतीसह नातेवाइकांना हे फोटो पाठवण्याचीही त्यांनी तिला धमकावले.अखेर, याप्रकरणी तिने ५ आॅक्टोबर रोजी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ७ आॅक्टोबर रोजी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपनिरीक्षक प्रियंका शिंदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
विवाहितेवर लैंगिक अत्याचारप्रकरणी खंडणीसाठी धमकावणा-या दाम्पत्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 21:41 IST