पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अटक
By Admin | Updated: July 13, 2016 20:40 IST2016-07-13T20:40:37+5:302016-07-13T20:40:37+5:30
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंडओहोळ शिवारात मच्छीमार सुखदेव रामचंद्र मोरे (४६) याने पत्नी गुलाबबाई सोबत भांडण करुन मारहाण केली

पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीला अटक
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंडओहोळ शिवारात मच्छीमार सुखदेव रामचंद्र मोरे (४६) याने पत्नी गुलाबबाई सोबत भांडण करुन मारहाण केली. मारहाणीत गुलाबबाईचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह येथील शेतात पुरुन संशयित आरोपी मोरे हो फरार झाला होता. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन रेल्वे पोलिसांनी त्याला क्रमांक एकच्या फलाटावर ताब्यात घेतले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरे हा उंडओहोळच्या वस्तीवर कुटुंबासमवेत राहत होता. मद्य पिऊन घरगुती कारणावरुन मोरे याने पत्नीसोबत वाद घालत मारहाण केली होती. या मारहाणीत गुलाबबाईचा रात्री मृत्यू झाला. घटनेची माहिती कोणाला होऊ नये म्हणून, जवळच्या शेतात मोरे याने मयत गुलाबबाईचा मृतदेह पुरला आणि धूम ठोकली. घटनेची माहिती वाडीवऱ्हे पोलीसांना मिळाल्यानंतर तहसिलदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी शेतजमीन उकरुन गुलाबबाईचा मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला. वाडीवऱ्हे पोलीस तेव्हापासून फरार संशयित मोरेच्या मागावर होते. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मोरे हा नाशिकरोड रेल्वे स्थानकावर असल्याची बाब सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मनोरे यांनी नाशिकरोड रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पवार यांच्याशी संपर्क साधून कळविली. त्यांना व्हॉटसअॅपवरुन फरार मोरेचा छायाचित्र पाठविला. त्यानंतर पवार यांनी प्रकाश कुलकर्णी, सुभाष कुलकर्णी, सत्यभामा चव्हाण, प्रमोद जाधव, विनित वाघमारे यांच्या मदतीने रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक-१च्या नवीन पुलाच्या परिसरात सापळा रचला. पुलाखाली मोरे हा बसलेला असताना या रेल्वे पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर वाडीवऱ्हे पोलीसांनी रेल्वेस्थानकावर येऊन मोरे यास अटक केली. मोरे याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यास इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या सोमवारपर्यंत (दि.१८) पोलीस कोठडी सुनावली आहे.