दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक
By Admin | Updated: July 23, 2016 02:40 IST2016-07-23T02:40:13+5:302016-07-23T02:40:13+5:30
जुईनगर येथे दरोड्याच्या तयारीत आलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक
नवी मुंबई : जुईनगर येथे दरोड्याच्या तयारीत आलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सापळ्याची चाहूल लागताच दरोडेखोर पळू लागल्याने पोलिसांना त्यांचा थरारक पाठलाग करावा लागला. त्यांच्याकडून नेरुळमधील घरफोडीची उकल झाली आहे.
जुईनगर परिसरात एक टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. प्रसंगावधानता राखून उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. यानुसार चव्हाण यांच्यासह उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, रुपाली पोळ, जगदीश पाटील, विद्याधर गायकवाड, अनिल सूर्यवंशी, गणेश चव्हाण, विकास जाधव यांच्या पथकाने जुईनगर सेक्टर २४ येथे सापळा रचला होता. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांचे पथक त्याठिकाणी दबा धरून बसलेले असताना काही जण रेल्वे पटरीवरून चालत येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु त्यांनाही पोलिसांनी सापळा रचलेला असल्याची चाहूल लागताच ते पळू लागले. यामुळे पोलिसांचाही त्यांच्यावरील संशय बळावल्यामुळे थरारक पाठलाग करावा लागला. त्यानुसार रेल्वे रुळावरून झाडीमध्ये अंधारात पाठलाग करून तसेच मोटरसायकलने पाठलाग करून पाच जणांना या पथकाने अटक केली. झडतीमध्ये त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य आढळून आले. यानुसार त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी नेरुळमध्ये एका मेडिकलवर दरोडा टाकल्याची कबुली दिली.
तसेच या दरोड्यात लुटलेले सामानही त्यांच्याकडे आढळून आले. प्रभू चौधरी (२१), समयवुन शेख (२०), रब्बीवुल शेख (२०), विष्णू मंडल (२१) व अमरुद्दीन शेख (५६) अशी त्यांची नावे आहेत. दरोड्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)