राष्ट्रवादी उपाध्यक्षाला दरोडा प्रकरणात अटक
By Admin | Updated: September 8, 2014 03:19 IST2014-09-08T03:19:27+5:302014-09-08T03:19:27+5:30
एका कंपनीतून माल घेऊन मुंबईला निघालेल्या टेम्पोचे अपहरण करून त्यातील माल लुटणाऱ्या गिरीश अंदाडे या शहापूर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली.

राष्ट्रवादी उपाध्यक्षाला दरोडा प्रकरणात अटक
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील वासिंद, दहागाव येथे एका कंपनीतून माल घेऊन मुंबईला निघालेल्या टेम्पोचे अपहरण करून त्यातील माल लुटणाऱ्या गिरीश अंदाडे या शहापूर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना ११ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून, इतर पाच जण इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडीसह फरार झाले आहेत.
साकीनाका येथील अप्सरा टेम्पो सर्व्हिसचा चालक नजीर खान (वय २१) व त्याचा क्लीनर अमझद अली (२२) हे दोघे दहागाव येथील एस्सेल प्रोपॅक कंपनीमधून टूथ ब्रश व टूथ पेस्टसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल भरून कारखान्यातून निघाले होते. त्याच वेळी टेम्पोला दरोडेखोरांनी ओव्हरटेक करून व इनोव्हा आडवी घालून तसेच मागून स्कॉर्पिओ गाडीने रस्ता अडवून बळजबरीने नडगाव रस्त्यावरील जंगलात चालकाला टेम्पो नेणे भाग पाडले. नंतर त्यांनी त्यातील माल लुटला. या दरोड्यात सापगाव ग्रामपंचायतीचा उपसरपंच व शहापूर तालुका राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष गिरीश अंदाडे हा आरोपी असल्याने तालुका राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.(वार्ताहर)