भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी

By Admin | Updated: December 30, 2014 01:30 IST2014-12-30T01:30:35+5:302014-12-30T01:30:35+5:30

गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़

Army salute again in Bhima-Koregaon | भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी

भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला पुन्हा लष्कराची सलामी

मुंबई : पुण्यातील भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला लष्कराच्या महार रेजिमेंटकडून दिली जाणारी मानवंदनेची परंपरा गेल्या चार वर्षांपासून खंडीत झाली होती़ ही परंपरा यंदाच्या १ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार असल्याने या विजयस्तंभाला खऱ्या अर्थाने विजयी सलामी मिळणार आहे़
ब्रिटिश व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात १ जानेवारी १८१८ रोजी लढाई झाली़ यात ब्रिटिशांकडून लढलेल्या महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैन्याचा दारुण पराभव केला. या लढाईनंतर पेशवाईचा अंत झाला़ यात महार बटालियनचे २२ सैनिक शहीद झाले होते़ त्यांच्या स्मरणार्थ भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आला़ या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी १ जानेवारीला या शहिदांना मानवंदना देण्यास हजारो जण येतात़ खुद्द डॉ़ बाबासाहेब आंबेडकरदेखील येथे या वीरांना मानवंदना देण्यासाठी येत होते.
स्वातंत्र्यानंतर लष्करातील महार रेजिमेंट येथे मानवंदना देण्यासाठी येत होती़ मात्र गेल्या काही वर्षांत ही मानवंदना काही कारणांमुळे बंद झाली़ अखेर महार रेजिमेंट माजी सैनिक संघटनेचे माजी सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, सुभेदार जाधव, हवालदार शांताराम सावंत, हवालदार संजय तांबे, हवालदार रमेश कदम, हवालदार दिलीप सावंत, नायक राजेश पवार यांनी ही मानवंदना पुन्हा सुरू करण्यास पाठपुरावा केला़ याची दखल घेत या संघटनेला मध्य प्रदेशच्या सागर येथील महार रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरमधील कमांडिंग आॅफिसर व इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ही मानवंदना यंदापासून पुन्हा देण्यात येईल, असे आश्वासन दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Army salute again in Bhima-Koregaon