प्राईम टाईमवरून सेना-राष्ट्रवादीने केली डेंची 'शोभा'
By Admin | Updated: April 8, 2015 14:09 IST2015-04-08T14:06:11+5:302015-04-08T14:09:29+5:30
प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

प्राईम टाईमवरून सेना-राष्ट्रवादीने केली डेंची 'शोभा'
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणा-या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना व राष्ट्रवादी आक्रमक झाली असून डे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मराठी जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याप्रकरणी डे यांनी सर्व जनतेची माफी मागावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हुकूमशहा असल्याची टीका डे यांनी ट्विटरवरून केली होती. तसेच आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी दही मिसळ आणि वडापाव खावा लागेल, असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला होता. मराठी चित्रपटांवर माझं प्रेम आहे, तो कधी आणि कुठे पहायचा हे माझं मला ठरवू दे. हा निर्णय म्हणजे फक्त दादागिरी आहे, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झाला असून जितेंद्र आव्हाड यांनीही डे यांच्यावर टीका केली आहे.
मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.