सैनिकाला भरदिवसा लुटले
By Admin | Updated: June 20, 2016 23:09 IST2016-06-20T23:09:26+5:302016-06-20T23:09:26+5:30
न्यायालयीन कामकाजासाठी शहरात आलेले लष्करातील हवालदार प्रकृती खराब झाल्यामुळे चक्कर येऊन पडले. त्यावेळी चार जणांनी त्यांच्या खिशातील रोख २१ हजार रुपये

सैनिकाला भरदिवसा लुटले
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २० - न्यायालयीन कामकाजासाठी शहरात आलेले लष्करातील हवालदार प्रकृती खराब झाल्यामुळे चक्कर येऊन पडले. त्यावेळी चार जणांनी त्यांच्या खिशातील रोख २१ हजार रुपये आणि मोबाईल, असा सुमारे २९ हजारांचा ऐवज बळजबरीने काढून नेला होता. एलोरा हॉटेलजवळ १३ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी २० रोजी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, लष्करातील हवालदार भाऊसाहेब दौलत आग्रे (रा. डोंगरगाव, ता.कन्नड) हे नाशिक येथे कार्यरत आहेत. ते सध्या रजेवर आहेत. त्यांचा आणि पत्नीचा न्यायालयीन वाद सुरू असल्याने १३ जून रोजी ते औरंगाबादेतील न्यायालयात आले होते. त्यानंतर दुपारी ते जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले. तेथील जेवण त्यांना व्यवस्थित न वाटल्याने ते हॉटेलबाहेर पडले. सकाळपासून जेवण न झाल्याने त्यांना प्रचंड अशक्तपणा आल्याने ते चक्कर येऊन कोसळले. रस्त्यावर ते अर्धवट बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून चार जण अचानक त्यांच्याजवळ आले. त्यांनी भाऊसाहेब यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख २१ हजार रुपये काढून घेतले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र शरीरात त्राण नसल्याने त्यांचा प्रतिकार कमी पडला. या घटनेनंतर ते गावी परत गेले आणि रुग्णालयात उपचार घेतले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी क्रांतीचौक ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय बनकर तपास करीत आहेत.