वाशिम जिल्ह्यातील दाम्पत्याची लष्कराच्या जवानांनी केली सुटका
By Admin | Updated: September 11, 2014 01:37 IST2014-09-11T01:34:34+5:302014-09-11T01:37:14+5:30
श्रीनगर येथील पूरात अडकलेले दाम्पत्य सुखरूप तीन दिवसानंतर झाला कुटुंबाशी संपर्क

वाशिम जिल्ह्यातील दाम्पत्याची लष्कराच्या जवानांनी केली सुटका
योगेश यादव/कारंजालाड
श्रीनगर येथील पूरात अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील एका नवदाम्पत्याची लष्कराच्या जवानांनी बुधवारी सुखरूप सुटका केली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दाम्पत्याशी संपर्क झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील युसूफ मामदानी यांचा २६ वर्षीय मुलगा तौसिफ आणि त्याची पत्नी अलमास हे १ सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. नियमित कुटुंबियांच्या संपर्कात असलेल्या या दाम्पत्याचा संपर्क अचानक तुटला. त्यामुळे तौसिफचे कुटुंबिय अस्वस्थ झाले होते. त्यातच जम्मू-काश्मीरमधील भीषण पूर परिस्थितीच्या बातम्या मामदानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चिंता वाढवित होते. अशा परिस्थितीत तब्बल तिसरा दिवस उजाडला तरी, तौसिफशी संपर्क होत नसल्याने चिंतेचे ढग गडद झाल होते.
तौसिफ मामदाणी आणि त्याची पत्नी श्रीनगरमधील पूरात अडकले होते. पूरात अडकलेल्या या दाम्पत्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी हेलिकॉफ्टरच्या सहाय्याने बाहेर काढले. तौसिफने बुधवारी ही सर्व माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. तौसिफचा आवाज ऐकताच कुटुंबियांच्या जिवात जीव आला. तौसिफ आणि त्याच्या पत्नीला शासनाच्यावतीने विमानाने मुंबई येथे पोहोचविले जाणार आहे.