सेना-भाजपातील गोंधळ कायम!
By Admin | Updated: November 24, 2014 03:47 IST2014-11-24T03:47:13+5:302014-11-24T03:47:13+5:30
शिवसेना-भाजपाच्या संभाव्य युतीसंदर्भात परस्परविरोधी विधाने करण्याचा दोन्ही पक्षांतील नेत्यांचा दिनक्रम सुरूच आहे

सेना-भाजपातील गोंधळ कायम!
मुंबई : शिवसेना-भाजपाच्या संभाव्य युतीसंदर्भात परस्परविरोधी विधाने करण्याचा दोन्ही पक्षांतील नेत्यांचा दिनक्रम
सुरूच आहे. एकीकडे अवघ्या काही तासांच्या अंतरात शिवसेनेचे अनंत गीते व संजय राऊत यांची एकमेकांना छेदणारी व्यक्तव्ये; तर आपल्याच सहकारी मंत्र्याला ‘नवीन’ असल्याची महसूलमंत्र्यांनी मारलेली टपली, यामुळे दोन्ही पक्षांतील
नेत्यांचा एकमेकांना पायपोस नसल्याचे दिसून येत आहे.
युतीमधील बेबनाव निवळत असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना असेल, अशी चर्चा जोर धरत असतानाच खा. संजय राऊत यांनी नेमके उलटे विधान केले. विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना मुख्य विरोधी पक्षाच्याच भूमिकेत पाहायला मिळेल, असे विधान राऊत यांनी केले.
सध्या भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या चर्चेबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. मात्र, आतापर्यंतची परिस्थिती पाहता हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरून शिवसेना सरकारला धारेवर धरेल. दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असणारे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदार सक्षम विरोधकाची भूमिका बजावतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने युतीच्या
बाजूने कौल दिल्याने दोन्ही पक्षांत चर्चेच्या फेऱ्या झडल्या.
तडजोडीनंतर अधिवेशनापूर्वी
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग निश्चित मानला जात होता. सहकार
व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील
यांनीही शिवसेना सरकारमध्ये सहभागी होईल, असे विधान कोल्हापुरात केले
होते. (प्रतिनिधी)