मुंबई - विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले मात्र या अधिवेशनातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विधानसभेच्या सभागृहात बसून कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर येताच शेतकरी नेते चांगलेच संतापले आहेत. महाराष्ट्रात दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करतायेत आणि कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत यांना लाजा कशा वाटत नाही अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, कृषिमंत्री किती बेजबाबदार आहेत याचे हे उदाहरण आहे परंतु हे पहिले नाही. याच कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्यासोबत केली. शेतकरी कर्जमाफीचा पैसा लग्नात, साखरपुड्यात उधळतात असे बोलले आणि आता हा माणूस विधानसभा सभागृहात रमी खेळत असेल तर त्यांची तुलना कुणासोबत करायची, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना अशी माणसं चालतातच कशी? या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करतायेत. यांना लाज कशी वाटत नाही असा घणाघात त्यांनी केला आहे.
तसेच इथे कंपन्या शेतकऱ्यांना खते द्यायला तयार नाहीत. न खपणारा माल शेतकऱ्यांच्या हाती मारला जातो. किटकनाशके, बियाणे बोगस निघालेत. ज्यांनी पेरणी केली त्यांची बियाणे बोगस निघालेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले असेल. या परिस्थितीत कृषिमंत्री रमी खेळत असेल तर त्याला काय बोलायचे, अजितदादांना कळायला हवे. या मंत्र्याच्या बुडावर लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून हाकललं पाहिजे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत कृषिमंत्री विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळताना दिसतात. यावर रोहित पवार म्हणतात की, सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला 'पिकविमा-कर्जमाफी-भावांतर'ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा टोला लगावला आहे.