Are you still waiting for a bribe? - Nana Patekar | अजून वणवा पेटायची वाट बघताय का? - नाना पाटेकर
अजून वणवा पेटायची वाट बघताय का? - नाना पाटेकर

जळगाव : ‘सरकारी वेतन ३५ वर्षांत २०० पटींनी वाढले. सोन्याचा भाव अनेक पटींनी वाढला, पण उत्पादन खर्च भरमसाठ वाढत असताना शेतमालाचा भाव फक्त आठपट वाढला, अशा परिस्थितीत शेतकरी काय करणार? मात्र, आपण अजून वणवा पेटायची वाट पाहत आहोत काय?’ असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे केला.
‘नाम फाउंडेशन’चे विश्वस्त नाना पाटेकर व अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत ३५३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले. त्यात जळगावमधील २४३ आणि धुळे जिल्ह्यातील ११० शेतकऱ्यांचा समावेश होता.
नाना म्हणाले, ‘जगण्यासाठी कारणे हवीत. डोंगराएवढे दु:ख शेतकऱ्यांसमोर आहे. आपण सण कसे साजरे करायचे. नकारात्मक विचार दूर सारू. आमची संस्था नाममात्र आहे. शेतकऱ्यांना लोकांचा आधार मिळत आहे. ही लोकचळवळ व्हावी. ‘नाम’ संस्था सर्वांची आहे.’
‘आपण बंदिस्त आयुष्य जगतो. संकुचित झालो आहोत. आरशात पाहून आपल्याला आपली किळस का येत नाही! आपण फक्त फुले, आंबेडकर यांची नावे घेतो. त्यांच्या विचारांची जोपासना करीत नाही,’ अशा भावना पाटेकर यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Are you still waiting for a bribe? - Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.