मुंबईतील खड्ड्यांचे बळी दिसत नाहीत का?
By Admin | Updated: February 14, 2017 03:57 IST2017-02-14T03:57:44+5:302017-02-14T03:57:44+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाषाणहृदयी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का

मुंबईतील खड्ड्यांचे बळी दिसत नाहीत का?
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाषाणहृदयी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, खड्ड्यांमुळे बळी पडणाऱ्या मुंबईकरांना पाहून तुमच्या हृदयावर कसला परिणाम झाल्याचे कधी जाणवले नाही. मग तुमच्या या असल्या हृदयांना काय म्हणायचे, असा पलटवार भाजपाने केला आहे.
नोटाबंदीच्या मुद्द्यावरून सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे. जाहीर सभांमधून दोन्ही नेते एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. नोटाबंदीमुळे भ्रष्ट नेत्यांची अडचण झाली मग तुम्हाला का त्रास झाला, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर, नोटाबंदीमुळे दोनशेहून अधिक माणसे हकनाक दगावली. लादलेल्या निर्णयामुळे दोनशे नागरिक दगावले त्याच्या वेदना झाल्या. त्या वेदनांकडे डोळेझाक करून मोदींचा उदो उदो तुम्ही करताय तितका पाषाणहृदयी मी नाही, असे चोख प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेत दिले होते.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी खड्ड्यातले बळी दिसत नाहीत का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत केला. मुंबईप्रमाणेच शांघायची स्थिती आहे. मात्र, तेथील कचरा, सांडपाणी व्यवस्थापन उत्तम मानले जाते. चीनचे राष्ट्राध्यक्ष झी चिनपिंग भारत दौऱ्यावर असता मुंबई-शांघाय भगिनी शहरे बनविण्याचा करार झाला होता. मात्र, सेनेने सांडपाणी, कचरा व्यवस्थापनाबाबत पावले उचलली नाहीत. याबाबत पालिका प्रतिसाद देत नसल्याचे शांघायच्या महापौरांनी म्हटल्याचे भांडारी यांनी सांगितले.(प्रतिनिधी)