पाटबंधारेच्या मुजोर कर्मचाऱ्यांना चाप

By Admin | Updated: March 4, 2017 03:42 IST2017-03-04T03:42:09+5:302017-03-04T03:42:09+5:30

लघुपाटबंधारे विभागात वर्षानुवर्षे एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Archbishop of Irrigation | पाटबंधारेच्या मुजोर कर्मचाऱ्यांना चाप

पाटबंधारेच्या मुजोर कर्मचाऱ्यांना चाप


ठाणे : लघुपाटबंधारे विभागात वर्षानुवर्षे एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवून बेशिस्त, मनमानी करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना चाप बसवण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
आवश्यक व गरजेच्या प्रशासकीय फायलींची पूर्तता करण्याऐवजी त्या २००५-०६ च्या पुरामध्ये वाहून गेल्याची खोटी माहिती या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी दिली जात असल्याच्या वृत्तास येथील कार्यकारी अभियंता उमेश पवार यांनी दुजोरा दिला आहे. स्वत:च्या टेबलवर राहण्याऐवजी अन्यत्र येजा करण्याची बेशिस्ती या कर्मचाऱ्यांमध्ये वाढीला लागली असता ती कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनादेखील कराव्या लागत असल्याची खंत व्यक्त करून त्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात आहे.
विनाकारण फायली अडवल्याचा अनुभव या कार्यालयास भेट देणाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कार्यालयीन वेळेत इतरत्र फिरणे, कार्यालयात उशिरा येणे, आजारपणाचे खोटे कारण देऊन वेळ दिलेल्या दिवशी कार्यालयात गैरहजर राहणे, काही कागदपत्रांची पूर्तता करण्याऐवजी ती महापुरात वाहून गेल्याची सांगून उडवाउडवीची उत्तरे देणे, फायलीतील महत्त्वाचे कागद गहाळ करणे आदी मनमानी होत असे. मात्र, दोन वर्षांच्या कालावधीपासून त्यास मोठ्या प्रमाणात आळा घालून मुजोर कर्मचाऱ्यांना ताळ्यावर आणल्याचे पवार यांनी सांगितले.
आजारपणाचे कारण देऊन सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मंडळाकडे सुपूर्द करून फिटनेस सर्टिफिकेट आणण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा पवार यांनी केला. त्यासाठी पिंगट या कर्मचाऱ्याचे उदाहरण त्यांनी दिले. सलग दोन वर्षे या कार्यालयास कायमस्वरूपी अधिकारी न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी होती. पण, आता कार्यालयाच्या सर्व अभिलेखांचे वर्गीकरण करून त्यांचे जतन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>कामकाजात सुसूत्रता आणून मनमानी संपुष्टात
सलग दोन वर्षे या कार्यालयास कायमस्वरूपी अधिकारी न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी होती. आता मात्र, परिस्थिती बदलली आहे. जुनी कागदपत्रेदेखील आता उपलब्ध असल्याची पुष्टी पवार देत आहेत. एवढेच नव्हे तर कोऱ्या कागदावर घेतल्या जाणाऱ्या स्वाक्षरीची पद्धत बदलून आता कार्यालयीन टिप्पणी व सर्व कागदपत्रे फायलीत उपलब्ध केली आहेत. यातून कामकाजात सुसूत्रता आणून त्यांची मनमानी व मुजोरी संपुष्टात आणल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे पवार यांनी मान्य केले.

Web Title: Archbishop of Irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.