‘दादां’च्या बुरुजावर ‘बाबां’चा सुरुंग

By Admin | Updated: October 11, 2014 05:36 IST2014-10-11T05:36:40+5:302014-10-11T05:36:40+5:30

सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आठपैकी सहा आमदार याच पक्षाचे. या टापूत आजपर्यंत दिसायची केवळ अजितदादांचीच छावणी

'Arang' of Baba on 'Dada' bastion | ‘दादां’च्या बुरुजावर ‘बाबां’चा सुरुंग

‘दादां’च्या बुरुजावर ‘बाबां’चा सुरुंग

सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. आठपैकी सहा आमदार याच पक्षाचे. या टापूत आजपर्यंत दिसायची केवळ अजितदादांचीच छावणी; परंतु यंदाच्या निवडणुकीत पृथ्वीराजबाबांच्या ‘टीम’नं लावलाय सुरुंग. धडाडू लागल्यात ‘कमळाबाई’च्याही तोफा. थोडक्यात, ‘राष्ट्रवादी’ बुलंद बुरुजांना बसू लागलेत चांगलेच हादरे .
राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची प्रचंड वर्दळ वाढलीय. पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात अन् सतेज पाटील यांच्यासह अनेक नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी सभांवर सभा घेताहेत. दुसरीकडे भाजपचे अतुल भोसले यांच्यासाठीही अनेक नेते वातावरण ढवळून काढताहेत. अपक्ष उमेदवार विलासराव पाटील-उंडाळकर मात्र, अद्याप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत प्रचार करताहेत. राज्यपाल डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र अजिंक्य पाटील यांची शिवसेनेची उमेदवारीही चर्चेचा विषय ठरलीय.
शेजारच्या पाटणमध्ये आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी स्वत:ऐवजी सुपुत्राला निवडणूक रिंगणात उतरविलंय. त्यांच्या विरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी शंभूराज देसाई यांनी शिवसेनेकडून शड्डू ठोकला असला तरी काँग्रेसचे हिंदुराव पाटील यांचीच मते मतदारसंघात निर्णायक.
वाई-खंडाळा-महाबळेश्वरमध्ये मात्र, चार जणांमध्ये ‘काँटे की टक्कर’. विद्यमान आमदार मकरंद पाटील अन् माजी आमदार मदन भोसले यांच्यातला नेहमीचा सामना रंगलेला. परंतु, यंदा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव ‘भाजप’कडून तर महाबळेश्वर मधील काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर शिवसेनेकडून मैदानात उतरलेत.
फलटण तालुक्यात आजपावेतो रामराजे नाईक-निंबाळकरांचंच अबाधित वर्चस्व. मात्र, लोकसभेला ‘स्वाभिमानी’च्या सदाभाऊ खोतांनी राजे गटाची शिट्टी वाजवली. तेव्हापासून चवताळून उठलेल्या रामराजेंनी आक्रमक प्रचाराचा धुमधडाका लावलाय. शिवसेनेचे नंदकुमार तासगावकर यांनीही ‘राजेंची कठपुतली’ म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्लाबोल चढविलाय. ‘स्वाभिमानी’त गेलेल्या दिगंबर आगवणेंनी पुन्हा शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर केल्यानं विरोधकांनी त्यांच्या ‘फटफजिती’चं वातावरण लोकांसमोर उभं केलंय.

Web Title: 'Arang' of Baba on 'Dada' bastion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.