‘मेट्रो रिजन’ला मंजुरी
By Admin | Updated: February 1, 2015 01:03 IST2015-02-01T01:03:20+5:302015-02-01T01:03:20+5:30
नागपूरच्या सीमेलगत २५ किलोमीटर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा प्रारूप आराखडा शनिवारी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला.

‘मेट्रो रिजन’ला मंजुरी
मुख्यमंत्र्यांचा पुढाकार : नागपूर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा
नागपूर : नागपूरच्या सीमेलगत २५ किलोमीटर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा प्रारूप आराखडा शनिवारी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. यावर दोन महिन्यात जनतेकडून आक्षेप आणि सूचना मागविण्यात येणार असून त्यानंतर त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यामुळे नागपूर परिसरातील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महानगर नियोजन समितीची बैठक न घेतल्याने हा विकास आराखडा प्रलंबित होता. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच यात लक्ष घातले. समितीवर नवीन सदस्य नामनिर्देशित केले. शनिवारी महानगर नियोजन समितीची विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंजूर विकास आराखड्यात नागपूर महापालिकेच्या हद्दीबाहेरील ७२१ गावांचा समावेश करण्यात आला असून तेथील ३५६७ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या विकासासाठी ४१ हजार २१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यात मेट्रो रेल्वे, बस, दवाखाने, उद्यान, व्यापारी संकुले, लॉजिस्टिक हब, शाळा, रस्ते आदी सुविधांचा समावेश असेल. ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी १ हजार हेक्टर जागा राखून ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी ५० टक्के निधी भूसंपादनाच्या अधिग्रहणाकरिता उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर उपस्थित होते.
काय असेल मेट्रो रिजनमध्ये ?
ट्रान्सपोर्ट सुविधा
लॉजिस्टिक हब
कन्व्हेन्शन सेंटर
मेट्रो रेल्वे, बस सुविधा
बस टर्मिनल्स
रस्त्याचे नेटवर्क
उद्याने व इतरही सुविधा