विदर्भात ‘डॅशिंग’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार
By Admin | Updated: January 4, 2015 00:53 IST2015-01-04T00:53:59+5:302015-01-04T00:53:59+5:30
आयएएस, आयपीएस, आयएफएस दर्जाचे अधिकारी विदर्भात प्रशासकीय सेवा देण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात ‘डेअर डॅशिंग’ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या

विदर्भात ‘डॅशिंग’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार
मुख्यमंत्री लागले कामाला : १५ जानेवारीला होणार बदल्यांची यादी प्रसिद्ध
गणेश वासनिक - अमरावती
आयएएस, आयपीएस, आयएफएस दर्जाचे अधिकारी विदर्भात प्रशासकीय सेवा देण्यास टाळाटाळ करतात. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भात ‘डेअर डॅशिंग’ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार केली जात असून ती १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे.
गृहखाते मुख्यमंत्र्याकडे असल्यामुळे पोलीस खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागणार आहे. त्यानुसार ज्या आयपीएस अधिकाऱ्यांचा सेवा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, ज्यांनी बदलीसाठी अर्ज केला, अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस विभागात काही आयपीएस अधिकारी ‘डेअर डॅशिंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या पोलीस अधिकाऱ्यांना विदर्भात आणण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना अवगत केले आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या राज्यभर बदल्या होत असल्या तरी यात विशेषत: ‘क्रिम’ अधिकारी हे विदर्भात गेले पाहिजे, त्याकरिता मुख्यमंत्रीच या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार करतील, अशी माहिती आहे. त्यामुळे आतापर्यंत विदर्भात सेवा नको म्हणणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावेच लागेल. विशेषत: गडचिरोली, चंद्रपूर या नक्षली भागात होणाऱ्या कारवाया रोखण्यासाठीसुद्धा ‘डेअर डॅशिंग’ पोलीस अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी बदलीपात्र आयपीएस अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध होऊन त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. मात्र काही आयपीएस अधिकाऱ्यांनी विदर्भात बदली होऊ नये, यासाठी भाजपच्या काही नेत्यांशी संपर्क साधण्याला प्रारंभ केला आहे.