महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच
By Admin | Updated: February 10, 2015 02:34 IST2015-02-10T02:34:46+5:302015-02-10T02:34:46+5:30
राज्य शासनाच्या विविध महामंडळांवर अध्यक्ष, संचालक, सदस्यांची नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महामंडळांवर कोणती पदे रिक्त

महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच
मुंबई : राज्य शासनाच्या विविध महामंडळांवर अध्यक्ष, संचालक, सदस्यांची नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महामंडळांवर कोणती पदे रिक्त आहेत, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत मागविली आहे.
या महिन्याअखेर महामंडळांवरील नियुक्तीला सुरुवात होईल. भाजपा आणि शिवसेनेत या पदांचे कुठलेही सूत्र अद्याप ठरलेले नाही. ते ठरविण्यासाठी भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांची बैठक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
या नियुक्तींमध्ये अन्य मित्र पक्षांना किती स्थान देण्यात येईल, याबाबत उत्सुकता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामलाही महामंडळांवर वाटा मिळण्याची अपेक्षा आहे.
भाजपाची नावे निश्चित करताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काही सहकारी मंत्र्यांशी मुख्यमंत्री चर्चा करतील. महत्त्वाची महामंडळे आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल आणि मंत्रीपदांप्रमाणेच महामंडळांबाबतदेखील शिवसेनेला कमी महत्त्वाची महामंडळे दिली जातील, असे मानले जाते. (प्रतिनिधी)