अरे व्वा.. ५४ दिवसांत ‘अनुकंपा’तून नोकरी; शासन धोरणात बदल
By समीर देशपांडे | Updated: July 22, 2025 12:23 IST2025-07-22T12:22:56+5:302025-07-22T12:23:38+5:30
उद्यापासून प्रक्रिया सुरू

संग्रहित छाया
समीर देशपांडे
काेल्हापूर : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १९७६ साली सुरू केलेल्या अनुकंपा नियुक्ती धोरणामध्ये आमूलाग्र बदल केला आहे. याहीपुढे जात मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात ही भरती करण्यात येणार असून उद्या सर्व जिल्हाधिकारी या विषयावर बैठक घेणार आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत म्हणजे केवळ ५४ दिवसांत आता पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रेच देण्यात येणार आहेत. यासाठीचे वेळापत्रकच शासनाने जाहीर केले आहे.
राज्य शासनाच्या गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्या कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अनुकंपा नियुक्ती केली जाते. मृत कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती, अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी, मृत्यूपूर्वी कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला अविवाहित मुलगा, विवाहित मुलगी, घटस्फोटित, परितक्त्या, विधवा मुलगी किंवा बहीण यांना या धोरणानुसार नियुक्ती देण्यात येते.
शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये संबंधितांचे अर्ज घेतले जातात आणि त्याची अद्ययावत यादी तयार करण्यात येते. ज्या पद्धतीने जागा रिक्त होतील त्यानुसार ठरलेल्या प्रमाणात त्या भरल्या जातात. आतापर्यंतचे या धोरणांचे ४६ शासन आदेश एकत्रित करून नवा शासन आदेश १७ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.
प्रमुख बदल खालीलप्रमाणे
- कर्मचाऱ्याच्या निधनानंतर १ वर्षात अर्ज करणे बंधनकारक होते. ही मुदत आता ३ वर्षे करण्यात आली आहे.
- अर्जाबाबत विलंब क्षमापित करण्यासाठी आधी प्रस्ताव विभागीय आयुक्त किंवा उच्चस्तरीय समितीच्या मुख्य सचिवांकडे पाठवावा लागत असे. आता तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल.
- आधीच्या धोरणानुसार ४५ वयानंतर संबंधिताचे नाव यादीतून बाहेर काढले जात असे. परंतु आता या ठिकाणी नाव बदलण्याची सोय करण्यात आली आहे.
- अनुकंपा नोकरीसाठी एकदा जे नाव दिले जाईल ते बदलता येत नव्हते. आता हे नाव बदलण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- गट क आणि ड या दोन गटात आधी बदल करणे शक्य नव्हते. परंतू आता गटामध्येही बदल करणे शक्य आहे.