बालगृहात सीसीटीव्ही बसवा
By Admin | Updated: June 11, 2015 02:11 IST2015-06-11T02:11:54+5:302015-06-11T02:11:54+5:30
बालगृहात गुटखा व तंबाखू पुरवले जात असल्याचा धक्कादायक अहवाल प्रधान दंडाधिकारी (ज्युएनाइल जस्टिस बोर्ड) यांनी उच्च न्यायालयात सादर केला आहे

बालगृहात सीसीटीव्ही बसवा
मुंबई : बालगृहात गुटखा व तंबाखू पुरवले जात असल्याचा धक्कादायक अहवाल प्रधान दंडाधिकारी (ज्युएनाइल जस्टिस बोर्ड) यांनी उच्च न्यायालयात सादर केला आहे. या अहवालाची दखल घेत न्यायालयाने राज्यातील सर्व निवारागृहे व बालगृहामंध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.
माटुंगा येथील डेव्हीड ससून बालगृहात एका अल्पवयीन मुलाचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्याची दखल घेत न्यायालयाने बालगृहांच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश बोर्डाला दिले होते. त्यानुसार न्या. व्ही. एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर याचा अहवाल सादर करण्यात आला.
बालगृहातील मुलांचा लैंगिक छळ होतो. तेथे गुटखा व तंबाखूही पुरवले जात असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली. त्यामुळे बालसुधारगृहांवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
महानगर दंडाधिकारी यांनी ज्युएनाइल बोर्डाला प्रौढ आरोपींच्या गुन्ह्याची दखल घेण्याचेही आदेश दिले असल्याचे या अहवालातून न्यायालयासमोर आले. मात्र बोर्डाकडे केवळ अल्पवयीन मुलांच्या गुन्ह्यांची दखल घेऊ शकते. त्यामुळे महानगर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाबाबतही खुलासा होणे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने नमूद केले आहे. या अहवालाची दखल घेत मुंबई व उपनगरांतील सर्व निवारागृहे व बालगृहांनी तेथील सद्य:स्थितीचा अहवाल सादर करावा. मुलींना ठेवण्यात आलेल्या बालगृहात केवळ महिला अधिकारी व सुरक्षारक्षकाचीच नेमणूक करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
अल्पवयीन आरोपींना बोर्डासमोर हजर न केल्याने तीन ते सहा महिन्यांपासून ते सुधारागृहातच असल्याचा मुद्दादेखील अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने जामीनपात्र गुन्ह्यात अटक अल्पवयीन आरोपींची तत्काळ जामिनावर सुटका करण्याचे आदेश बोर्डाला दिले आहेत.