‘मिसिंग’ नगरसेवकाला घरी येण्याचे आवाहन
By Admin | Updated: January 15, 2017 05:50 IST2017-01-15T05:50:09+5:302017-01-15T05:50:09+5:30
‘गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही घरी आलाच नाहीत. तुमच्या नसण्यामुळे एक प्रकारची अवकळा आली आहे. कृपया परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही.’ अशी आर्जवे एक आई

‘मिसिंग’ नगरसेवकाला घरी येण्याचे आवाहन
पुणे : ‘गेल्या कित्येक दिवसांपासून तुम्ही घरी आलाच नाहीत. तुमच्या नसण्यामुळे एक प्रकारची अवकळा आली आहे. कृपया परत या, आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही.’ अशी आर्जवे एक आई आपल्या लेकराला करीत आहे. या अज्ञात आईने थेट स्वत:च्या हरवलेल्या चिरंजीव ‘नगरसेवका’च्या मिसिंगचे फलकच शहराच्या मध्यवस्तीत लावून ‘माया’ व्यक्त केली आहे.
महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर आता राजकीय जुगलबंदीला सुरुवात झाली आहे. नारायण पेठ आणि त्या आसपासच्या भागातील रस्त्यारस्त्यांवर ‘नगरसेवक हरवला आहे’ असे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक महापालिकेने तत्परता दाखवत हटवण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु कुठले कुठले फलक हटवायचे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. नारायण पेठ, रमणबाग चौक, मेहुणपुरा, केसरी वाड्याजवळ, पूना बेकरी, तांबडी जोगेश्वरी आदी भागामध्ये आणि प्रामुख्याने जुना प्रभाग क्रमांक ३७च्या हद्दीमध्ये हे फलक लावण्यात आलेले आहेत. या फलकावर ‘चि. नगरसेवक हरवला आहे. तु गेल्यापासून प्रभाग आजारी आहे. तरी लवकर ये, तुझीच मतदार आई.’ आणि ‘नगरसेवक हरवले आहेत. जेथे असाल तेथून लवकर निघून या. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही’ अशी वाक्ये छापण्यात आलेली आहेत.
एकंदर निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. नोटाबंदीच्या काळात उपहासात्मक फलक शहरभर लावण्यात आले होते. त्याच पद्धतीचा आता या रणधुमाळीमध्ये उपयोग करून घेतला जात असल्याचे दिसत आहे. आता मिसिंग नगरसेवक डेरेदाखल होतात, की भलतेच मूल मतदारआई दत्तक घेते हे आगामी काळात स्पष्ट होईलच. (प्रतिनिधी)