एमईटीच्या कारभाराविरोधात हायकोर्टात अर्ज
By Admin | Updated: October 16, 2015 03:28 IST2015-10-16T03:28:22+5:302015-10-16T03:28:22+5:30
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त मुंबई नॉलेज सिटीमध्ये (एमईटी) सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याने या शैक्षणिक संस्थेचा कारभार नीट चालविण्याचे आदेश द्यावेत

एमईटीच्या कारभाराविरोधात हायकोर्टात अर्ज
मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या वादग्रस्त मुंबई नॉलेज सिटीमध्ये (एमईटी) सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याने या शैक्षणिक संस्थेचा कारभार नीट चालविण्याचे आदेश द्यावेत, असा अर्ज संस्थेचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी उच्च न्यायालयात केला आहे.
एमईटीच्या विद्यार्थ्यांकडून वारेमाप फी वसूल करण्यात येत आहे. २०१२ मध्ये नव्याने सुरू केलेले कोर्सेस बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. सध्या या संस्थेत सगळा गैरकारभार सुरू आहे, असे आरोप करत एमईटीचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी उच्च न्यायालयात मूळ याचिकेत अर्ज केला आहे.
एमईटीचा कारभार नीट चालवण्याचे आदेश संस्थेला द्यावे किंवा न्यायालयाने या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी कोणीतरी नेमावे, अशी मागणी कर्वे यांनी अर्जाद्वारे केली आहे. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. या आधी कर्वे यांनी एमईटीच्या भोंगळ कारभारावर अंकुश लावण्यासाठी प्रशासक नेमण्यासाठी अर्ज केला होता. मात्र धर्मदाय आयुक्तांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्याविरद्ध कर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. (प्रतिनिधी)