अप्पाची होती २५ वर्षे दहशत!
By Admin | Updated: May 28, 2015 23:16 IST2015-05-28T23:16:48+5:302015-05-28T23:16:48+5:30
अकरा गुन्हे, सहा वेळा चॅप्टर केसेस, पाच वेळा तडीपारी, चार गुन्ह्यांमध्ये शिक्षा, याशिवाय मोक्काची कारवाई ही मालिका आहे कुख्यात अप्पा लोंढेच्या गुन्ह्यांची.

अप्पाची होती २५ वर्षे दहशत!
तब्बल आठ खून : याशिवाय खंडणी, बेकायदा शस्त्र, चॅप्टर केस अन तडीपारी...
पुणे / लोणी काळभोर : तब्बल आठ खून, खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे, खंडणीचे सोळा गुन्हे, बेकायदा शस्त्र बाळगल्याचे अकरा गुन्हे, सहा वेळा चॅप्टर केसेस, पाच वेळा तडीपारी, चार गुन्ह्यांमध्ये शिक्षा, याशिवाय मोक्काची कारवाई ही मालिका आहे कुख्यात अप्पा लोंढेच्या गुन्ह्यांची. गेल्या २५ वर्षांपासून जिल्ह्यामध्ये स्वत:च्या गुंडगिरीची दहशत निर्माण करुन वाळू
माफिया बनलेल्या खंडणीखोर लोंढेचा गुरुवारी सकाळी अत्यंत निर्घूनपणे खून झाला. गुन्हेगाराचा अंत गुन्हेगारीच्याच पद्धतीने होतो हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.
अप्पा ऊर्फ प्रकाश हरीभाऊ लोंढे (वय ५५, रा. उरुळी कांचन) नावाची दहशत त्याच्या भावाच्या खुनानंतर ख-या अर्थाने उदयास आली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे बेकायदेशीर धंद्यांमध्ये उतरलेला अप्पाचा भाऊ विलास याची उरुळी कांचन परिसरामध्ये मोठी दहशत होती. त्याच्या नावाने भल्या भल्यांना कापरे भरायचे. विलास आणि अप्पा या दोघांची लोंढे टोळी जिल्ह्यात दहशत माजवित असताना बेकायदेशीर धंद्यांवर पकड ठेवून होती. त्यांच्या टोळीचे साम्राज्य झपाट्याने वाढत चाललेले असताना पोलीस मात्र हतबलतेने सर्व पहात बसलेले होते. वाळू व्यवसाय आणि क्रशरच्या व्यवसायात उतरल्यानंतर तर लोंढेने कहरच केला.
वाळू माफिया ही नवी ओळख त्याला मिळाली. बेकायदेशीर धंदे, एमआयडीसीमधील गुंडगिरी, गोरगरिबांच्या जमिनी बळकावण्याचे धंदे जोरात सुरु झाले. जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे लोंढे टोळीची पाळेमुळे रुजु लागली होती.
यवतच्या व्ही. वाय. दोरगे पाटील यांची वाळू व्यवसायामधील सद्दी संपवून लोंढे बंधूंनी या व्यवसायात पाय रोवले. मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेल्या पैशांच्या आधारे त्याने टोळीही पोसली. मुंबईमधील गुन्हेगारांशी संधान बांधले. वाळूचे ठेके घेण्यापासून ते भाऊ बंदकीतील वाद सोडविण्यापर्यंतची सर्व कामे लोंढे बंधु करु लागले.
व्याजाने पैसे देऊन जमिनी बळकावायच्या हा नित्याचा कार्यक्रम झाला. त्यांची वाढती दहशत बघून राजकारणी त्यांच्या जवळ गेले. लोंढे बंधूंच्या दहशतीचा वापर करुन अनेकांनी निवडणुका जिंकल्या. पुढे विलास लोंढे उरुळी गावचा सरपंच झाला. त्याने हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद पदरात पाडून घेतले.
पुर्ववैमनस्यातून विलासचा २००२ साली अप्पा लोंढेसमोरच गोरख कानकाटे, आण्णा गवारी, उत्तम कांचन, प्रविण कुंजीर, प्रमोद कांचन, विकास यादव, विष्णू जाधव, सोमनाथ कांचन, रविंद्र गायकवाड, सतिश जाधव यांनी खून केला होता. मारुती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या विलासला वार करुन ठार करण्यात आले होते. त्यानंतर या टोळीची सर्व सुत्र आप्पाच्या हाती आली. त्याच्या दहशतीला आळा घालण्यासाठी तत्कालीन अधीक्षक भुजंगराव शिंदे आणि अतिरीक्त अधीक्षक प्रविण पाटील यांनी लोंढे टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई केली. पाच वर्ष कारागृहात घालवल्यानंतर लोंढे २००९ ला बाहेर आला. त्याने पुन्हा
पुन्हा गुन्हेगारीला सुरुवात केली होती.
त्याच्या गुन्हेगारीला आळा बसण्याकरीता लोणी काळभोर पोलिसांनी १९९२, १९९७, १९९९ व २०१० मध्ये तडीपारीची कारवाई केली होती. मात्र, तत्कालीन राज्य सरकारने वेळोवेळी त्याच्याविरुद्धची तडीपारी रद्द केल्यामुळे त्याचे मनोबल वाढले होते. आपल्या बेकायदेशीर कृत्यांच्या आधारे त्याने कोट्यावधींची माया जमवली. गेली २५ वर्ष जिल्ह्यामध्ये धुमाकुळ घालणा-या दहशतीचा गुन्हेगारीच्याच मार्गाने जात अंत झाला. (वार्ताहर)
४लोंढेला २००४ मध्ये खंडणीच्या दोन गुन्ह्यांमध्ये २९ मे २००६ मध्ये ३ महिने सक्त मजुरी व पाचशे रुपये दंडांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर ११ जानेवारी २००८ रोजी ३ वर्षे सक्त मजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाळू चोरीच्या गुन्ह्यात त्याला २३ आॅगस्ट २००६ मध्ये ३ वर्षे सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा देखील झाली होती.
४अप्पा लोंढेवर १९८९ मध्ये यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर १९९० मध्ये त्याच्या भावजयीने त्याच्या विरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली. १९९१ व २००४ साली यवत पोलीस ठाण्यात खून, २००० मध्ये लोणी काळभोर व २००२ मध्ये स्वारगेट पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ व २००३ मध्ये देखील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन खून केले होते. २०११ मध्ये त्याने यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी दोन खून केले होते.