‘त्या’ एपीआयची नियंत्रण कक्षात उचलबांगडी; चौकशी सुरू
By Admin | Updated: December 17, 2014 03:24 IST2014-12-17T03:24:23+5:302014-12-17T03:24:23+5:30
वरिष्ठ महिला अधिकाऱ्याबद्दल अश्लील शेरेबाजी करणाऱ्या सहाय्यक निरीक्षक एम. आर. पाटील याच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारला असून

‘त्या’ एपीआयची नियंत्रण कक्षात उचलबांगडी; चौकशी सुरू
जमीर काझी, मुंबई
वरिष्ठ महिला अधिकाऱ्याबद्दल अश्लील शेरेबाजी करणाऱ्या सहाय्यक निरीक्षक एम. आर. पाटील याच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारला असून त्याची आज तडकाफडकी वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात बदली करून विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. रेकॉर्डिंग क्लिपमधील आवाज त्याचाच असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली असून निरीक्षक ‘ढेपाळे’विरुद्ध सबळ पुरावा मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. अश्लील शेरेबाजीमुळे त्रस्त वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांचा जबाब मंगळवारी उपायुक्तांनी नोंदवला.
पोलीस दलात महिला अधिकाऱ्याबाबत सहकाऱ्यांकडून होत असलेल्या बीभत्स शेरेबाजी व ते संभाषण ‘व्हॉट्सअप’वरुन प्रसारित करण्याचा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून दोन दिवसांत ढेपाळेविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
ढेपाळे व एपीआय पाटील यांच्याकडून चारित्र्यहनन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्याने ८ दिवसापूर्वी आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे तक्रार दिली होती, मात्र त्यानंतरही या गंभीर प्रकाराबाबत चौकशीची कारवाई संथगतीने सुरु होती. ‘लोकमत’ने सोमवारी हा विषय मांडल्यानंतर वाहतूक शाखेने उपायुक्त आनंद मंड्या यांच्याकडे चौकशी सोपवून तातडीने अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. व्हॉटस्अपवरून व्हायरल केलेल्या क्लिप’मध्ये एम. आर. पाटील हा ढेपाळेचे संबंधित महिला अधिकाऱ्याबद्दल काय मत आहे, यांचे अत्यंत गलिच्छ भाषेत सांगितले आहे. त्याने ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची आवश्यकत होती. मात्र त्याने ते तिऱ्हाईत व्यक्तीला सांगितल्याने शिस्तभंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवून त्यांची तातडीने विक्रोळी वाहतूक चौकीतून ट्रॅफिक मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचे आदेश सहआयुक्त (वाहतुक) डॉ.बी.के.उपाध्याय यांनी दिले. ढेपाळे खरेच असे बोलला आहे का, याला अन्य काही आधार नाही. त्यामुळे त्याबाबत अधिक माहिती मिळविली जात आहे. त्यासाठी मंड्या यांनी तक्रारदार महिलेचा आज वाहतूक मुख्यालयात जबाब नोंदविला.