आता कुणाचाही पाठिंबा चालेल - एकनाथ खडसे
By Admin | Updated: November 10, 2014 12:19 IST2014-11-10T12:16:07+5:302014-11-10T12:19:41+5:30
शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला नाही, तर भाजपा कुणाचाही पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

आता कुणाचाही पाठिंबा चालेल - एकनाथ खडसे
औरंगाबाद : शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला नाही, तर भाजपा कुणाचाही पाठिंबा घेण्यास तयार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यांना आम्ही पाठिंबा मागितला नव्हता; परंतु आता आम्ही कुणाचाही पाठिंबा घेऊ, असे सांगून खडसे यांनी सरकार १२ नोव्हेंबर रोजी विशेष अधिवेशनात पूर्ण बहुमत सिद्ध करील, असा दावा केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जनतेने भाजपा व इतर पक्षांच्या बाजूने कौल दिला, असे त्यांनी आधी स्पष्ट केले आणि नंतर भाजपा राष्ट्रवादीसह कुणाचाही पाठिंबा घेणार असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे बहुमताची परीक्षा भाजपाला अवघड असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीदरम्यान झालेले आरोप- प्रत्यारोप विसरून सेनेचे काही सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचे भाजपाने ठरविले होते. मानापमान हा विषय नाही. शिवसेना सर्व काही विसरून एक पाऊल पुढे आल्यास पुन्हा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. भेदभाव न ठेवता सेनेने सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
शिवसेना सोबत येणार असेल तर उद्या पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. राज्यात सेना- भाजपाला अनुकूल वातावरण आहे. भाजपा व मी शेवटपर्यंत आशावादी आहे.
बहुमत सिद्ध करू
- भाजपाचे सरकार बहुमत सिद्ध करील. बहुमत कसे सिद्ध करणार, पाठिंबा कुणाचा घेणार, याबाबत महसूलमंत्री खडसे यांनी अधिक उत्तरे देणे टाळले.
- एका खाजगी कार्यक्रमासाठी ते औरंगाबादला आले होते. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना बहुमत, शिवसेना- भाजपा युती आणि दुष्काळ व पाणीटंचाईच्या आढाव्याची माहिती दिली.
- यावेळी आ. अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती.