दहशतवादविरोधी पथकांचा मोबाईल सीमकार्डवर ‘वॉच’

By Admin | Updated: August 7, 2014 00:55 IST2014-08-07T00:55:37+5:302014-08-07T00:55:37+5:30

सामान्य नागरिकांकडून विविध ठिकाणी दिल्या जाणाऱ्या केवायसी फॉर्मचा गैरवापर होत असल्याची भीती दहशतवादविरोधी पथकांना आहे. त्यातूनच या पथकांनी मोबाईल सीमकार्डवर

Anti-terrorism Squads 'watch' on mobile SIM card | दहशतवादविरोधी पथकांचा मोबाईल सीमकार्डवर ‘वॉच’

दहशतवादविरोधी पथकांचा मोबाईल सीमकार्डवर ‘वॉच’

युजर्सची तपासणी : ‘केवायसी’च्या गैरवापराची पोलिसांना भीती
यवतमाळ : सामान्य नागरिकांकडून विविध ठिकाणी दिल्या जाणाऱ्या केवायसी फॉर्मचा गैरवापर होत असल्याची भीती दहशतवादविरोधी पथकांना आहे. त्यातूनच या पथकांनी मोबाईल सीमकार्डवर लक्ष केंद्रित केले असून कंपन्यांना सीमकार्डचा नेमका ‘युजर्स’ कोण हे तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका आणि सण-उत्सव एकाच वेळी येत आहेत. या उत्सवांसाठी राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘रसद’ पुरविली जाणार आहे. राजकीय स्वार्थासाठी दंगली पेटविल्या जाण्याची, त्याला खतपाणी घातले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावेळी सण-उत्सवात शांतता अबाधित राखण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे राहणार आहे. म्हणूनच पोलीस प्रशासनाने आतापासूनच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मोबाईलचा गैरवापर रोखणे हा अशाच उपाययोजनांचा एक भाग आहे. राज्यातील दहशतवादविरोधी पथकांच्या सर्व शाखांनी मोबाईल ‘युजर्स’वर लक्ष केंद्रित केले आहे.
विविध मोबाईल कंपन्यांकडून अवघ्या २० ते ३० रुपयांत सीमकार्ड जारी केले जाते. कंपनी ज्या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड जारी करते प्रत्यक्षात त्याचा वापर (युजर्स) दुसराच करीत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले आहे. अशा बोगस युजर्सचा शोध घेण्यासाठी मोबाईल कंपन्यांना पोलिसांनी कामी लावले आहे. मोबाईलचे सीमकार्ड नेमके कुणाच्या नावाने जारी झाले आणि सध्या कोण वापरतो आहे, याची शहानिशा कंपन्यांकडून कॉल करून केली जात आहे. गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांसाठी बोगस पद्धतीने सीमकार्ड मिळविले गेल्याचे अनेक प्रकरणात निष्पन्न झाले आहे. कुणाच्या तरी नावाने सीमकार्ड खरेदी करून त्याचा घातक कामांसाठी वापर झाल्यानंतर ते तोडून टाकण्याचे प्रकारही घडले. हे प्रकार रोखण्यासाठीच पोलिसांच्या सूचनेनुसार मोबाईल कंपन्यांकडून युजर्सची खात्री केली जात आहे.
कारागृहांमध्ये बोगस सीमकार्ड
राज्यातील काही कारागृहांमध्ये चोरट्या मार्गाने गुन्हेगारांकडे मोबाईल पाठविले जातात. या मोबाईलमध्ये बोगस सीमकार्ड वापरले जातात. परस्परच कुणाच्या तरी नावावर हे सीमकार्ड घेतले जाते. प्रत्यक्षात त्यालाही याबाबतची कल्पना नसते. सामान्य व्यक्तीने केव्हा तरी कुठे तरी वैयक्तिक कामासाठी दिलेल्या कागदपत्रांचा कुणी तरी गैरवापर करतो आणि परस्परच हे सीमकार्ड मिळवून गुन्हेगारी कारवायांसाठी त्याचा वापर केला जातो. नागपूर मध्यवर्ती कारागृहात यापूर्वी असे प्रकार सिद्ध झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
झेरॉक्स देताना सावधगिरी बाळगा
घर, वाहन व अन्य कामांसाठी कर्ज घेताना केवायसी (नो युवर कस्टमर) फॉर्म भरुन दिला जातो. त्यासोबत स्वत:च साक्षांकित केलेले पॅन कार्ड, इलेक्ट्रीकल बिल, फोटो ओळखपत्र याची झेरॉक्स लावली जाते. परंतु अनेकदा हीच कागदपत्रे गैरकामासाठी वापरली जाण्याची दाट शक्यता असते. या कागदपत्रांचा सीमकार्ड खरेदीसाठी वापर होण्याची आणि हे सीमकार्ड दहशतवादी, गुन्हेगारी कारवायांसाठी वापरले जाण्याची शक्यता असते. हे प्रकार टाळण्यासाठी ‘केवायसी’ देताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना पोलिसांनी नागरिकांना केल्या आहेत. स्वत: साक्षांकित करून दिल्या जाणाऱ्या झेरॉक्स कॉपीवर त्याचे कारण स्पष्टपणे नमूद करावे. आपण दिलेला कागद पुन्हा उपयोगात येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना आहेत. पोलीस विभाग, दहशतवादविरोधी पथक, सायबर क्राईम विभाग यांच्यामार्फत याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. मोबाईल कंपन्यांना रहिवासी पत्ता दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण अथवा खात्री होत नाही. केवळ फोन कॉलवर काम भागविले जाते. त्यामुळेच मोबाईल सीमकार्डच्या गैरवापराचे प्रकार वाढल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Anti-terrorism Squads 'watch' on mobile SIM card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.