लाचलुचपत प्रतिबंधक विभाग RTI च्या कक्षेतच
By Admin | Updated: October 30, 2014 20:55 IST2014-10-30T20:54:07+5:302014-10-30T20:55:57+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी रद्द केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग RTI च्या कक्षेतच
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा आघाडी सरकारचा अध्यादेश राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी रद्द केला. राज्यपालांच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
आघाडी सरकारने सत्तेवरुन पायउतार होताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती अधिकाराच्या कक्षेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात घाईघाईने अधिसूचनाही काढण्यात आली होती. आघाडी सरकारच्या या निर्णयावर राज्यभरातून टीका झाली होती. माहिती अधिकार कायद्याच्या कलम २४ (४) चा दाखला देत सरकारने हा निर्णय घेतला असला तरी हा कलम गुप्त वार्ता आणि संरक्षण संघटना यांनाच लागू होतो असे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. अखेरीस राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी हा अध्यादेश रद्द करत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणका दिला. राज्यपालांनी आघाडी सरकारने काढलेला अध्यादेश रद्द केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग माहिती अधिकाराच्या कक्षेत आले आहे.