पुण्यात स्वाईन फ्लूचा आणखी एक बळी
By Admin | Updated: August 21, 2016 20:52 IST2016-08-21T20:52:51+5:302016-08-21T20:52:51+5:30
स्वाईन फ्लूने शहरात आणखी एकाचा बळी गेला आहे

पुण्यात स्वाईन फ्लूचा आणखी एक बळी
ऑनलाइन लोकमत,
पुणे, दि. 21 - स्वाईन फ्लूने शहरात आणखी एकाचा बळी गेला आहे, त्यामुळे या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची शहरातील संख्या आता दहावर गेली आहे. महंमदवाडी येथील (६१) वर्षाच्या ज्येष्ठाचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. रुग्णाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, प्रकृती साथ देत नसल्यामुळे विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे आढळून आले, उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.
या महिन्यातील स्वाईन फ्लूचा हा दुसरा मृत्यू असून जानेवारी महिन्यापासून शहरातील स्वाईन फ्लूची लागण झालेले २७ रुग्ण असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. जानेवारी २०१६ पासून आत्तापर्यंत स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांपैकी ४ रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीतील तर ६ पिंपरी-चिंचवड महापालिका विभागातील आहेत.
याविषयी राज्य आरोग्य विभागाचे डॉ. प्रदिप आवटे यांना विचारले असता ते म्हणाले, जानेवारी २०१६ पासून राज्यातील स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २४ झाली आहे. आतापर्यंर राज्यात ७७ जणांना या आजाराची बाधा झाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये तसेच नागरिकांमध्येही पालिकेकडून आणि राज्य शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.