क्यू-नेट घोटाळ्यातील आणखी आरोपी गजाआड
By Admin | Updated: November 4, 2014 03:05 IST2014-11-04T03:05:47+5:302014-11-04T03:05:47+5:30
लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या क्यू-नेट घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागाने तरुण रतानी या आरोपीला अटक केली

क्यू-नेट घोटाळ्यातील आणखी आरोपी गजाआड
मुंबई : लाखो गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या क्यू-नेट घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागाने तरुण रतानी या आरोपीला अटक केली असून, विशेष न्यायालयाने रतानीला १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
विविध वस्तू विकून लाखो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून क्यू-नेट कंपनीने अनेक गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले़ हा घोटाळा तब्बल ४२५ कोटी रुपयांचा आहे़ गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात हे प्रकरण उघडकीस आले़ अनेक गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागात याचा गुन्हा नोंदवला़ त्यानंतर या विभागाने आरोपींचे अटकसत्र सुरू केले़ या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात रतानीने अनेकांना या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले व या प्रशिक्षणासाठी त्याने शुल्कही आकारले होते़ या शुल्काद्वारे त्याने तब्बल ५० लाख रुपये गोळा केले़ मात्र प्रत्यक्षात प्रशिक्षणार्थींना याचा काहीच लाभ झाला नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे़
याबाबत अधिक तपास करण्यासाठी तरुणला पोलीस कोठडी ठोठवावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयासमोर केली़ तर या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा तरुणकडून करण्यात आला़ मात्र प्रथमदर्शनी तरुणविरोधात पुरावे असल्याचे नमूद करीत न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ (प्रतिनिधी)