वार्षिक दसहजारी रक्त पुरवठ्याचा उपक्रम
By Admin | Updated: May 8, 2014 12:35 IST2014-05-08T12:35:06+5:302014-05-08T12:35:06+5:30
रेडक्रॉसचा उपक्रम : नैसर्गिक आपत्ती निवारणात सांगलीच्या रेडक्रॉस सोसायटीचा सहभाग

वार्षिक दसहजारी रक्त पुरवठ्याचा उपक्रम
सांगली रेडक्रॉस सोसायटीची मुळात स्थापना झाली ती युध्दातील जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी. आता मात्र ही संघटना नैसर्गिक आपत्तीबरोबर इतर सामाजिक उपक्रम राबवत आहे. सांगली जिल्ह्याच्या रेडक्रॉस सोसायटीने चाळीस वर्षापूर्वी स्थापन केलेल्या रक्तपेढीकडून आता वर्षाला सुमारे दहा हजारजणांना रक्त पुरवठा करण्यात येत आहे. बोलावणे आल्यानंतर या सोसायटीचे सदस्य संपूर्ण देशातील नैसर्गिक आपत्ती निवरणासाठी धावून जातात. सांगली जिल्ह्याच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या शाखेची स्थापना १९६९ मध्ये करण्यात आली. यामध्ये भगवानलाल कंदी, डॉ. पी. जी. पुरोहित, श्रीनिवास नाटेकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर, व्यापारी, उद्योजक, वकील मंडळी यामध्ये सहभागी आहेत. त्यावेळी राज्यात आलेला पूर, दुष्काळ निवारणामध्ये यांचा सहभाग होता. सांगली जिल्ह्यामध्ये वेळेत रक्ताचा पुरवठा होत नसल्यामुळे अनेक रुग्ण दगावण्याचे प्रकार होत होते. रक्तपेढीची गरज लक्षात घेऊन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य उज्वल तिळवे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी १९७३ मध्ये डॉ. शिरगावकर रक्तपेढीची स्थापना केली. या पेढीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे दहा हजारहून अधिक रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. संपूर्ण महाराष्टÑ व कर्नाटकातून आलेल्या रुग्णांना याचा लाभ होतो. वर्षाला लाखो रुपयांचे नुकसान सोसून ही रक्तपेढी चाळीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे. आज रेडक्रॉस सोसायटीच्या सांगली शाखेची सदस्य संख्या दीडशे आहे. या संघटनेचे जिल्हाधिकारी हे पदसिध्द अध्यक्ष आहेत. उज्वल तिळवे हे सचिव म्हणून कार्यरत आहेत. मागणीनंतर या संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येते. देशाच्या कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्ती आल्यास सांगली जिल्ह्यातील सदस्य धावून जातात. भारताच्या दक्षिण भागात सुनामीची लाट आली तेव्हा सांगली जिल्ह्यातील वीस सदस्य चेन्नईमध्ये ठाण मांडून होते. रुग्णांसाठी औषधोपचार, जीवनावश्यक साहित्याचे वाटप या संघटनेकडून करण्यात आले.