ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करा

By Admin | Updated: September 20, 2016 04:00 IST2016-09-20T04:00:00+5:302016-09-20T04:00:00+5:30

राज्य सरकारप्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले धोरण जाहीर करावे

Announce senior citizen policy | ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करा

ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करा


कल्याण : राज्य सरकारप्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी आपले धोरण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिक महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर बुधवार, २१ सप्टेंबरला मोर्चा काढणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार महापालिका रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कक्ष असावा, तेथे योग्य उपचार मिळावेत. डोंबिवलीतील बालभवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, महापालिकेच्या मालकीची अन्य सभागृहे सवलतीच्या दरात मिळावीत. विरंगुळा केंद्रे स्थापन करावीत. विक्रेत्यांनी व्यापलेली पदपथे मोकळी करावीत. १५ जून ज्येष्ठ नागरिक छळप्रतिबंधक-जागृती दिवस, २१ सप्टेंबर जागतिक स्मृतिभ्रंश दिवस आणि १ आॅक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस हे तीन दिवस केडीएमसीने विविध उपक्रमांद्वारे साजरे करावेत. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ज्येष्ठांसंदर्भात आर्थिक तरतूद करावी, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), कोकण प्रादेशिक विभाग यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला जाणार आहे. चार वर्षांपूर्वी महासंघाने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन केडीएमसीच्या आयुक्तांना सादर केले होते. परंतु, प्रदीर्घ काळ उलटूनही या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने बुधवारचा मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष रमेश पारखे यांनी दिली.
सरकारी धोरणाचा भाग असलेल्या मागण्या प्रलंबित राहिल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. डोंबिवली शहरातील १९ ज्येष्ठ नागरिक संघटनांनी या निषेध मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केल्याचे पारखे म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Announce senior citizen policy