चवदार सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन
By Admin | Updated: March 19, 2015 22:23 IST2015-03-19T22:23:34+5:302015-03-19T22:23:34+5:30
अस्पृश्याच्या भिंती गाडून पददलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले.

चवदार सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन
भीमसागर लोटणार : ऐतिहासिक घटनेला लोटली ८८ वर्षे
महाड : अस्पृश्याच्या भिंती गाडून पददलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्या ऐतिहासिक घटनेचा ८८ वा वर्धापन दिन आज महाडमध्ये साजरा करण्यात येणार असून यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये भीमसागर लोटणार आहे.
१९ मार्च १९२७ रोजी डॉ. आंबेडकरांनी महाडमध्ये पहिली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद घेतली होती. तर २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून तळ्याचा सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनांच्या वर्धापनदिनी आंबेडकरी जनता आपल्या लाडक्या भीमरायाला वंदन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाडमध्ये दाखल होत आहेत. समता सैनिक दलाचे क्रांतीस्तंभावर संचलन स. ९ वा. होणार असून स. ११ वा. याच ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांची सभा होणार आहे. तसेच भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाराम इंदिसे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले, मनोज संसारे आदिंच्या वेगवेगळ्या अभिवादन सभा होणार आहेत.
यानिमित्त संपूर्ण महाड शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आलेली असून नगरपरिषदेमार्फत उपस्थित भीमसैनिकांसाठी सर्व सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. चवदार तळे व क्रांतिभूमी परिसरात सर्वत्र दुकाने थाटण्यात आली असून या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)