अण्णाच्या जुगार अड्ड्यावर धाड

By Admin | Updated: August 20, 2014 01:03 IST2014-08-20T01:03:20+5:302014-08-20T01:03:20+5:30

बहुचर्चित अण्णा ऊर्फ अनिल राऊत याच्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्त ईशू सिंधू आणि त्यांच्या दोन पोलीस उपायुक्त सहकाऱ्यांनी एकाचवेळी धाड घालून ११ जुगाऱ्यांना अटक केली.

Anna's gambling stands | अण्णाच्या जुगार अड्ड्यावर धाड

अण्णाच्या जुगार अड्ड्यावर धाड

तीन उपायुक्तांनी केली संयुक्त कारवाई : ११ जुगारी जेरबंद, रोख अन् बंदूकही जप्त
नागपूर : बहुचर्चित अण्णा ऊर्फ अनिल राऊत याच्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्त ईशू सिंधू आणि त्यांच्या दोन पोलीस उपायुक्त सहकाऱ्यांनी एकाचवेळी धाड घालून ११ जुगाऱ्यांना अटक केली. जुगार अड्ड्यावरून साडेतीन लाखांची रोख, साडेचार ते पाच लाखांचे सोने, बीअर, बंदूक आणि तलवारही जप्त केली. एखाद्या जुगार अड्ड्यावर तीन पोलीस उपायुक्तांनी एकत्रितपणे धाड घालण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच कारवाई आहे.
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिडीपेठ, घाटे किराणा स्टोर्स जवळ (चंदा अतकरच्या घरात) अण्णा राऊतचा जुगार अड्डा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. बिल्डर, व्यापारी, स्वयंकथित नेते, कुख्यात गुन्हेगार, अवैध धंदेवाले अशी सर्वच मंडळी या जुगार अड्ड्यावर लाखोंची हारजीत करतात. या अड्ड्यावर बीअर, दारू, खमंग खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचीही सुविधा उपलब्ध असते. पोलिसांना महिन्याला लाखोंचा मलिदा मिळतो, त्यामुळे ठाण्यातील पोलीस याकडे दुर्लक्ष करतात. पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांना ही माहिती कळताच त्यांनी कारवाईची तयारी केली. ठरल्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी या अड्ड्यावर धाड घातली.
बाहेरून कुलूप, आतमध्ये जुगार
या अड्याला बाहेरून कुलूप लावलेले होते. मात्र,आतमध्ये ११ जुगारी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळत होते. पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी खिडकीतून उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अड्ड्याला चोहोबाजूने पोलिसांनी घेरल्यामुळे कुणालाही यश आले नाही. उलट उडी मारल्यामुळे दोघांना गंभीर दुखापत झाली.
अनिल भय्याजी राऊ त (वय ३४, रा़ बिडीपेठ), मिलिंद रामभाऊ दुपारे (वय ४२, रा. गल्ली नं १, जगनाडे चौक), शहजार खान मोहम्मद खान (वय ३६, रा़ ठाकूर प्लॉट, नागपूर), विजेंद्र उत्तमराव केवतकर (वय ४२, रा. जय भोलेनगर), सचिन उत्तमराव नितनवरे (वय ३२, रा. जुना बिडीपेठ), रिजवान खान मोईनुद्दीन खान (वय ३२, रा़ बिडीपेठ), धनराज पुनाराम कांबळे (वय ४८, रा. जुना बगडगंज), गोंविदा नारायण भुल्लो (वय ५२, रा़ पाचपावली), उमेश महादेवराव उईके (वय २३, रा़ नरसाळा, संभाजीनगर), विनोद कन्हैयालाल फुलवानी (वय ४०, रा़ बगडगंज) आणि प्रवीण राजू पिल्ले (वय १८, रा. न्यू बिडीपेठ, नागपूर) या जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. (प्रतिनिधी)
रोकड, बीअर, बंदूक अन् तलवारही
पोलिसांनी या जुगार अड्ड्यावरून ३ लाख, ६१ हजारांची रोकड, एक कार, साडेचार ते पाच लाखांचे सोने, बीअरच्या ६० बाटल्या (कॅन), एक बंदूक, तलवार, १० मोबाईल आणि दुचाक्यांसह सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जुगाऱ्यांना पकडल्याच्या काही वेळेनंतर त्यांना पोलीस ठाण्यातून जामिनावर मोकळे करण्यात येते. मात्र, या अड्ड्यावर जुगारासोबतच शस्त्रे आणि दारूही सापडल्यामुळे पोलिसांनी मुंबई जुगार कायद्यासोबतच हत्यार कायदा आणि दारूबंदी कायद्यानुसारही गुन्हे दाखल केले. त्यामुळे पोलिसांना जुगाऱ्यांचा आज कोर्टातून एक दिवसाचा पीसीआर मिळवता आला.
डीसीपी आले आॅटोत बसून
तीन दिवसांपूर्वी डीसीपी सिंधू यांना या जुगार अड्ड्याची माहिती कळली होती. त्यांनी जुगार अड्डा परिसराची पाहाणी करून एक मॅप तयार केला. त्यानंतर त्यांचे बॅचमेट परिमंडळ एकचे डीसीपी अभिनाशकुमार तसेच औरंगाबाद ग्रामीणच्या सहकारी डीसीपी निर्मला देवी एस. (परिमंडळ तीनच्या उपायुक्त) यांना सोबत घेऊन मंगळवारी रात्री कारवाईची योजना आखली. वाडीचे ठाणेदार मुरलीधर करपे यांना तसेच अन्य २० पोलीस कर्मचाऱ्यांना सीताबर्डीत गोळा करण्यात आले. एका आॅटोत तीन डीसीपी आणि पाच आॅटोत बसून पोलिसांचा ताफा अण्णाच्या जुगार अड्डयावर धडकला आणि जुगाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या.

Web Title: Anna's gambling stands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.