अण्णाभाऊ साठे महामंडळातील ८० कोटींची रक्कम गायब!
By Admin | Updated: May 15, 2015 12:09 IST2015-05-15T04:44:20+5:302015-05-15T12:09:32+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल ८० कोटी रुपयांची रक्कम महामंडळाच्या खात्यांमधून परस्पर काढून

अण्णाभाऊ साठे महामंडळातील ८० कोटींची रक्कम गायब!
यदु जोशी, मुंबई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल ८० कोटी रुपयांची रक्कम महामंडळाच्या खात्यांमधून परस्पर काढून हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महामंडळाच्या बीड, जालना, परभणी, हिंगोली, भंडारा आणि बुलडाणा या सहा जिल्ह्णामधील कार्यालयात ८० कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यातून अनेक गैरप्रकार उघडकीस आले. महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून जिल्ह्णांच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आणि तेथील कर्मचारी ही रक्कम सेल्फ किंवा बेअरर चेकने काढत असत. हे सगळे होत असताना बँकेने तरी त्यांना ही रक्कम अशा पद्धतीने कशी काय काढू दिली, असा गंभीर प्रश्न समोर आला आहे. महामंडळाचे मुख्यालय, जिल्ह्णाजिल्ह्णातील कार्यालये आणि बँकेच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याचे म्हटले जात असून त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरविण्यात आली आहेत. महामंडळातून कोणाला व्यवसाय वा अन्य कारणासाठी कर्ज द्यायचे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रस्तांवाची छाननी करून शिफारस करते. ही प्रक्रिया न अवलंबिता मुंबई मुख्यालयातून प्रस्ताव मंजूर करून बोगस नावांवर कोट्यवधी रुपये उचलण्यात आल्याचेही प्रकरण समोर आले आहे. याशिवाय, लाच घेतल्याप्रकरणी सजा सुनावण्यात आलेले जळगावचे जिल्हा व्यवस्थापक जी.बी.पवार आणि तेथील कारकून एम.एम.जाधव यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया महामंडळाने सुरू केली आहे.