अण्णा हजारे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे हस्तक - शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी
By Admin | Updated: June 2, 2017 17:44 IST2017-06-02T17:36:08+5:302017-06-02T17:44:59+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.

अण्णा हजारे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे हस्तक - शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 2 -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत.
शेतकरी संपाला अण्णा हजारे यांच्या पाठिंब्याची गरज नाही. ते आंदोलनादरम्यान आणि आंदोलनानंतर जराही फिरकले नाहीत. आता आंदोलन एका मोठ्या वळणावर आले असता ते मध्यस्थी करत आहेत. पण त्यांनी किसान क्रांतीच्या सदस्यांना मध्यस्थी करताना विचारले आहे का?, असाही प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.
खरं तर राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना ते एका आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबीयांना भेटले नाहीत. खरं तर अण्णा हजारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक आहेत, असा आरोपही सूर्यवंशी यांनी केला आहे.
""अण्णांनी आमची वकिली करू नये. आम्ही शेतकरी आमची वकिली करण्यास समर्थ आहोत, असेही जयाजीराव सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
""शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खर्चावर आधारित हमी भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज किंवा इतर खासगी कर्ज शेतकरी फेडू शकत नसल्यामुळे नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
जेव्हा सहन करण्याची क्षमता संपते तेव्हा शेतकरी नाइलाजास्तव रस्त्यावर उतरतो आणि सरकारला विनंती करुन सांगतो की मी माझ्या परिवारासाठी तसेच माझ्याजवळ असणाऱ्या माझ्या गाई, बैल आणि इतर पशुधन वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे.
अशा वेळी सरकारने सहानभुतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे"", असे सांगत अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शनला आहे. मात्र अण्णांचा पाठिंबा नको असल्याचे शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.