लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे यांना पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे, असे एका घटनाक्रमाने प्रमोद महाजन यांच्या मनात आले आणि तेव्हापासून माझा छळवाद सुरू झाला, त्यामुळे मी भाजप सोडून गेलो, अशी वेदना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी बुधवारी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करताना बोलून दाखविली. ‘अण्णा! आपण भाजप सोडून गेलात याची खंत मुंडे साहेबांनाही होती’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग सावरून घेतले.
आपले दोन मुलगे चिमण आणि विश्वनाथ तसेच समर्थकांसह अण्णांनी २३ वर्षांनंतर भाजपमध्ये घरवापसी केली. प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अण्णा डांगे म्हणाले की, जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरे-वाईट बोलणे योग्य नाही पण पक्षात त्यावेळी एक चुरस निर्माण झाली. अटलजींना कोणी विचारले की आपले उत्तराधिकारी कोण त्यावर त्यांनी प्रमोद महाजन यांच्यासह तीन-चार नावे घेतली. आपण पंतप्रधान होणार, असे महाजन यांच्या डोक्यात शिरले मग आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असेही त्यांच्या मनात आले अन् तिथून माझा छळवाद सुरू झाला.
बाळासाहेबही माझ्या कामावर खूश होते
माझ्याकडे असणाऱ्या पाणीपुरवठा खात्यामार्फत सुमारे साडेपंधरा हजार कोटी रुपयांची टँकरमुक्तीची योजना चांगल्या रितीने राबविली जात होती. या कामाची दखल सर्वदूर घेतली गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या माझ्या कामावर खूपच खूश होते. उद्या भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव आले तर बाळासाहेब ते उचलून धरतील, असे चित्र होते, तेही अडचणीचे ठरले, असे अण्णा डांगे म्हणाले.
‘तो’ आमच्या मनात नाही
सांगली जिल्ह्यातील आणखी कोणी मोठे नेते भाजपमध्ये येणार का, या प्रश्नात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जो प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही.
घरची व्यक्ती घरी आल्याचा आनंद फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णा...आपण ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला काय सांभाळणार? आपणच आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही चांगले काम करत राहू. परखड स्वभाव असलेले अण्णा एका विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडून गेले, पण गोपीनाथरावांना त्याची नेहमीच खंत होती. तेव्हाही पक्षात त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान होता. अण्णांनी पक्ष सोडला पण त्यांच्यावर झालेला संस्कार आणि त्यातून तयार झालेला विचार त्यांनी कधीही सोडला नाही. भाजप हेच आपले घर आहे हीच त्यांची भावना नेहमी राहिली, घरची व्यक्ती घरी आल्याचा आम्हालाही आनंद आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, चिमण डांगे आदींची भाषणे झाली.